शस्त्र सदृश्य वस्तूने वार करण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीने दोन वर्षात केले दोन खून
प्रशांत चंदनखेडे वणी
जीवे मारण्याच्या इराद्याने शस्त्र सदृश्य वस्तूने हल्ला चढविण्यात आलेल्या अनोळखी इसमाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शस्त्रासारख्या वस्तूने शरीरावर ठिकठिकाणी वार करण्यात आल्याने हा इसम गंभीर जखमी झाला होता. शहरातील बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर मरणासन्न अवस्थेत हा इसम पडून होता. ही माहिती नंतर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले होते. नागपूर येथे उपचार सुरु असतांना त्याचा ३० मार्चला मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र त्याच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत दादाराव कुमरे (२३) रा. सिंधी ता. मारेगाव असे या क्रूरकर्म्याचे नाव आहे. त्याने याआधीही एका अनोळखी इसमाचा खून केला होता. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला. आणि आणखी एका व्यक्तीच्या खुनात त्याने आपले रंगले आहे.
बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर २६ मार्चला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास एक इसम विवस्त्र व मरणासन्न अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमीला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला रेफर करण्यात आले होते. या अनोळखी इसमावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अनिकेत दादाराव कुमरे याने कुठल्यातरी अज्ञात कारणावरून या अनोळखी इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळविला. आरोपीने दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका अनोळखी इसमाचा खून केला होता. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने परत एका अनोळखी इसमाला हेरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या इसमाचाही ३० मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिकेत कुमरे या अट्टल गुन्हेगाराने एका मागून एक दोन इसम यमसदनी धाडले आहेत. निर्दयीपणे माणसांची हत्या करणाऱ्या या आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला आहे. वणी सारख्या शांतताप्रिय शहरात दोन इसमांच्या हत्या करणारा हा आरोपी दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहे. निर्दयीपणे खून करण्याइतपत हा आरोपी निर्ढावला असून तो इतरांसाठीही धोकादायक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. अनिकेत कुमरे या क्रूरकर्म्याने दोन वर्षांपूर्वी हत्या केलेल्या इसमाचीही ओळख पटली नव्हती. तर त्याने दुसऱ्यांदा खून केलेल्या इसमाचीही अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिस खून झालेल्या या इसमाची ओळख पटविण्याचा हरसंभव प्रयत्न करीत आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: