प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका व्यावसायिक संकुलाला लागलेल्या भीषण आगीत न्यू रसोई हॉटेल पूर्णतः जळून खाक झाले. ही आग २६ मार्चला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत आहे. यात हॉटेल मधील किंमती वस्तू व साहित्य पूर्णतः जळाल्याने हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने याच व्यावसायिक संकुलात असलेली बँक आगीची झळ बसण्यापासून थोडक्यात बचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. परंतु आगीचे लोट निघतांनाचे भयावह दृश्य धडकी भरविणारे होते.
साई मंदिराच्या विरुद्ध बाजूला नांदेपेरा वळण रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक संकुलाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांना व्यावसायिक संकुलातून धूर निघतांना दिसला. त्यानंतर क्षणातच आग भडकली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता ही माहिती अग्निशमन दलाला दिली. पोलिसांकडून सूचना मिळाल्याने अग्निशमन दलाची वाहने शीघ्र घटनास्थळी पोहचली. मात्र तोवर आगीने रौद्र रूप धारण केले होते. व्यावसायिक संकुलातून स्फोट होत असल्यासारखे आवाज येत होते. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाहता पाहता आगीने व्यावसायिक संकुलातील वरच्या माळ्यावर असलेल्या न्यू रसोई हॉटेलला पूर्णतः आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग विझवेपर्यंत न्यू रसोई हॉटेल आगीच्या भक्षस्थानी चढले होते. सुदैवाने आगीच्या ज्वाळा तळमजल्यावर असलेल्या बँकेपर्यंत न पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत न्यू रसोई हॉटेल मधील किंमती वस्तू व साहित्य पूर्णतः जाळून खाक झाले. त्यामुळे हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र हॉटेल मालकाचे नेमके किती नुकसान झाले व ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: