युवा, तडफदार व लोकप्रिय नेता हरपला, खासदार बाळू धानोरकर यांचं अल्पशा आजारानं निधन

 



युवा, तडफदार राजकीय नेते म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात लोकप्रिय असलेले खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं आज 30 मे ला पहाटे 3.30 वाजता दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय जेमतेम 48 वर्ष होतं. खासदार बाळू धानोरकर हे एक चतुर राजकारणी म्हणून ओळखले जायचे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते. प्रखर राजकीय नेतृत्व म्हणून ते उभरले होते. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास लोकसभा क्षेत्रापर्यंत पोहचला. चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून दणदणीत विजय संपादन करतानाच त्यांनी वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून आपल्या सहचारणीचा विजय साकार केला. मतदारसंघातील विकास कामांबरोबरच नागरिकांच्या कामांनाही प्राथमिकता देणारा नेता म्हणून खासदार बाळू धानोरकर यांना लोकपासंती मिळाल्याने त्यांच्या विजयाचं सत्र अविरत सुरू राहिलं. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेलं हे लोकप्रिय नेतृत्व हरपल्याने मतदारसंघात व त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं तर दुःख अनावर झालं आहे. 

खासदार बाळू धानोरकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी दिल्ली येथील वेदांत्ता रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना किडनी स्टोनचा आजार झाला होता. त्यानंतर परत त्यांना वेदना होऊ लागल्याने त्यांना नागपूर येथिल खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने काल त्यांना पूर्वी शस्त्रक्रिया केलेल्या दिल्ली येथीलच वेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. वेदांता रुग्णालयात त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू असताना त्यांनी आज पहाटे 3.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. उमेदीच्या राजकारणात त्यांचं असं हे अकाली निधन झाल्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय नेतृत्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्ता पोरका झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची वार्ता मतदार संघात पसरताच अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. एवढेच नाही तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते ठणठणीत बरे व्हावे याकरिता काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी आज चंडिका यज्ञ करण्याची तयारी केली होती. पण त्यांचा उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज वरोरा मोक्षधाम येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  अवघ्या 48 वर्षाच्या वयात त्याचं आजारपणाने निधन झाल्याने विदर्भासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. एका पक्षाची लाट असताना देखील तगडे आव्हान पेलून विजयी झालेले खासदार बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे निवडून आलेले एकमेव खासदार होते.  यावरून त्यांची राजकारणावरील पकड किती मजबूत होती, याची प्रचिती येते.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी