नागपूर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वणीतील शेतकऱ्यांचा संताप उफाळला! बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला जाहीर पाठिंबा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
नागपूर येथे बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाला आता वणी तालुक्यातूनही जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. वणीतील विविध शेतकरी संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदन सादर करत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही तर वणीतील हजारो शेतकरी जेल भरो आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करत म्हटले की, निवडणुकीच्या काळात “सातबारा कोरा करू” म्हणत मतांची माळ ओवणारे फडणवीस सरकार आता गप्प बसले आहे. आश्वासन पाळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. “सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरणे, हे या सरकारचे धोरण झाले आहे,” असा थेट आरोप निवेदनात करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत भरीव मदत करण्याऐवजी सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. “शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही परत मिळणार नाही, अशी मदत देऊन शेतकऱ्यांचा घोर अपमान करण्यात आला आहे,” असा संतापही व्यक्त करण्यात आला.
सरकारी खरेदी केंद्र अजूनही सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि कापूस घरात पडून आहे. शेतमालाच्या दराची घोषणा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी राबविण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफ्याचा भाव मिळत नाही, त्यामुळे आत्महत्यांचा दर वाढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
📢 सरकारला थेट इशारा
निवेदनातुन सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, “सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्यांचे कर्ज पूर्ण माफ करा, प्रति एकर ५० हजार नुकसानभरपाई द्या, खरीप हंगामासाठी विनाअट कर्ज उपलब्ध करून द्या. अन्यथा खुर्च्या खाली करा!” शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.
✊ वकील संघाचाही ठाम पाठिंबा
या आंदोलनाला वणी वकील संघानेही खुले समर्थन दिले आहे. वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विरेंद्र महाजन, सचिव ॲड. अमोल टांगे, ॲड. शेखर वऱ्हाटे, ॲड. विप्लव तेलतुंबडे, ॲड. अमन शेख आदी वकिलांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना एकजुटीचा संदेश दिला.
👥 निवेदन सादर करताना उपस्थिती
निवेदन देताना मधुकर लांडे, कॉ. मनोज काळे, कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, अजय धोबे, लक्ष्मण देठे, गजानन राजुरकर, कुंदन टोंगे, गीत घोष, पुंडलिक पिंपळशेंडे, संजय गोहोकर, किसन राजुरकर, सतीश भटगरे, सेनापती पावडे आदी उपस्थित होते.
🚩 “शेतकऱ्यांचा संयम सुटला तर महाराष्ट्र थांबेल!”
निवेदनाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा देतांना म्हटले की, “नागपूरच्या रस्त्यावर जे आंदोलन सुरू आहे, त्याकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. शेतकऱ्यांचा संयम संपला, तर महाराष्ट्र थांबेल!”

No comments: