प्रशांत चंदनखेडे वणी :-
ऑनलाईन माध्यमातून पार्सल पोस्टाद्वारे प्रतिबंधित शस्त्र मागविल्याचा प्रकार वणी शहरात उघडकीस आला आहे. याबाबत वेळीच माहिती मिळाल्यानंतर वणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिरपूर येथील एका पानठेला चालकास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट मास्टरच्या समय सूचकतेमुळे हा प्रकार समोर आला.
दिनांक २३ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता, वणी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर जयप्रकाश बलकी यांनी पंजाब येथून एक संशयास्पद पार्सल आल्याची माहिती ठाणेदार गोपाल उंबरकर यांना दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत ठाणेदारांनी डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने यांना पथकासह वणी पोस्ट ऑफिस येथे पाठवून पार्सलबाबत शाहनिशा करण्यास सांगितले. त्यानंतर डीबी पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली.
पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या पार्सलवर नरेंद्र महादेव केळकर रा. शिरपूर, ता. वणी असा पत्ता लिहिला होता. डीबी पथकाने पार्सलवरील पत्त्याच्या आधारे शिरपूर येथे जाऊन सदर इसमाचा शोध घेतला असता तो तेथे आढळून आला. पानठेला चालक असलेल्या नरेन्द्र महादेवराव केळकर (वय ३५ ) याला डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सदर तलवार ऑनलाईन पद्धतीने पार्सल पोस्टाद्वारे मागविल्याची कबुली दिली.
यानंतर आरोपीला वणी पोस्ट ऑफिस येथे आणून पंचासमक्ष पार्सल उघडण्यात आले. त्यामध्ये निळ्या कव्हरमध्ये लोखंडी धातूची धारदार तलवार आढळून आली. तलवारीची एकूण लांबी २ फूट ८ इंच, धार असलेल्या भागाची लांबी २ फूट ३ इंच, तर अंदाजे किंमत १,३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर तलवार प्रतिबंधित शस्त्र असल्याने ती पंचासमक्ष जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख एपीआय धीरज गुल्हाने, डीबी पथकाचे गजानन कुडमेथे व हरिभाऊ दळवे यांनी केली. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

No comments: