Latest News

Latest News
Loading...

मोटारसायकलची 'चावी' काढल्याच्या संशयातून रस्त्यावर राडा; लाकडी दांडक्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारू दुकानासमोर सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर पोहोचला. मोटारसायकलच्या चावीवरून निर्माण झालेल्या संशयातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना वणी तालुक्यातील रासा गावाजवळ घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत प्रदीप मुकांदा बोर्डे (२७, रा. घोन्सा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते रासा गावासमोरील देशी दारू दुकानाजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोटारसायकलवर बसलेल्या संजय खोके (रा. मारेगाव-कोरंबी) याला त्यांनी खाली उतरण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

याच वेळी संजय खोके याने फिर्यादीवर "तू माझ्या मोटारसायकलची चावी घेतली आहे" असा आरोप करत वाद घातला. फिर्यादीने त्याचा आरोप फेटाळताच, आरोपीने "तू इथेच थांब, मी माझी माणसं बोलावून तुला मारतो," अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

यानंतर फिर्यादी रासा येथील पेट्रोल पंपाजवळ आला असता, संजय खोके हा एका साथीदारासह मोटारसायकलवर तेथे पोहोचला. पुन्हा चावीच्या कारणावरून वाद घालत रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडी काठी उचलून त्याने फिर्यादीच्या खांद्यावर व पायावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्याच्या खांद्याला व पायाला सूज आली. त्यानंतर आरोपीच्या साथीदारानेही हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. जखमी तरुणाने वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजय खोके व त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.