Latest News

Latest News
Loading...

माहेरवरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ?; अखेर गळफास घेऊन संपविले जीवन, पतीविरुद्ध गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी :-

माहेरहून वारंवार पैसे आणण्यासाठी दबाव, दारूच्या नशेत मारहाण आणि सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वणी तालुक्यातील बोर्डा येथे १९ जुलैला उघडकीस आली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा सुनिल पडवे (वय ३२) यांनी त्यांच्या नव्याने बांधलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिचा भाऊ सतीश तात्याजी चामाटे (रा. मंदर) तातडीने बोर्डा येथे पोहोचला. त्यानंतर त्याने वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मृत बहिणीच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

फिर्यादीनुसार, सन २०१३ मध्ये उषा यांचा विवाह सुनिल गजानन पडवे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवस सुरळीत संसार सुरु होता. मात्र त्यानंतर पतीने माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे हा प्रकार वारंवार घडत असल्याने या छळाला कंटाळून उषा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुनिल पडवे यांना घर बांधण्यासाठी माहेरकडून यापूर्वी सुमारे अडीच लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आणखी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा सुरू होता. काही दिवसांपूर्वी उषा यांनी आपला भाऊ व इतर नातेवाईकांना फोन करून, "पैसे आणले नाहीत तर पतीकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या सततच्या त्रासामुळे जगण्याचा कंटाळा आला आहे," असे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या कथित छळामुळेच उषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारे वणी पोलिसांनी पतीविरुद्ध बीएनएसच्या कलम १०८ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे बोर्डा गावात हळहळ व्यक्त होत असून माहेरवरून पैसे आणण्यासाठी झालेल्या मानसिक छळामुळे विवाहितेवर जीवन संपविण्याची वेळ आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Powered by Blogger.