Latest News

Latest News
Loading...

पत्रकाराचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे अधिकाऱ्याला भोवले; अदखलपात्र गुन्हा दाखल


प्रशांत चंदनखेडे वणी :-

पत्रकाराचा सुमारे चार वर्षांपूर्वीचा वैयक्तिक व्हिडीओ त्याच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केल्याचा प्रकार एका अधिकाऱ्याला चांगलाच भोवला आहे. सदर व्हिडीओ प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप करीत पत्रकार निलेश अशोकराव चौधरी यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संबंधित दारूबंदी अधिकारी (तक्रारीत बोडेकर असा उल्लेख आहे) यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

पत्रकार चौधरी यांनी ११ ऑगस्ट रोजी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सुमारे चार वर्षांपूर्वीचा त्यांचा एका व्यक्तीसोबतचा वैयक्तिक व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय संबंधित व्यक्तींच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रसारित अथवा शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ अशा पद्धतीने प्रसारित झाल्याने आपली वैयक्तिक व सामाजिक प्रतिमा मलिन होत असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पत्रकार म्हणून आपल्या सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला असून, व्हिडीओ कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आला, तो कोणकोणत्या व्यक्तींना पाठविण्यात आला आणि त्यामागे बदनामीचा हेतू होता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात केवळ तक्रार नोंदवून न थांबता व्हिडीओच्या प्रसाराची डिजिटल साखळी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हिडीओ कोणी, कधी, कोणत्या माध्यमातून आणि कोणकोणत्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये प्रसारित केला, याबाबत आवश्यक डिजिटल पुरावे तपासावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

व्हिडीओच्या प्रसारामुळे आपल्याविषयी गैरसमज निर्माण होऊन वैयक्तिक सुरक्षेबाबत भीती व चिंता निर्माण झाल्याचेही चौधरी यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. भविष्यात आपल्या जीवितास अथवा मालमत्तेस कोणताही धोका किंवा अनुचित प्रकार घडल्यास या प्रकरणातील संबंधितांची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, चौकशीत बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ प्रसारित केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून, व्हिडीओच्या प्रसारामागे नेमकी कोणाची भूमिका होती आणि तो किती व्यक्तींपर्यंत पोहोचला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Powered by Blogger.