Latest News

Latest News
Loading...

कवडशी येथील जि.प. शाळेची भिंत कोसळली; सुदैवाने टळला अनर्थ

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या धोकादायक अवस्थेकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर शाळा सुरु असतांनाच शाळेच्या व्हरांड्याची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. मात्र, या घटनेने शाळेतील २३ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

कवडशी येथील जि.प. प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, दोन वर्गखोल्या जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. या खोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी डिसेंबर २०२५ पासून पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदनेही देण्यात आली. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी सकाळी शाळा सुरू असताना व्हरांड्याची भिंत कोसळली. भिंत कोसळण्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या आसपास घडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने अनर्थ टळला. यापूर्वीही वर्गखोलीचा काही भाग पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे वर्ग तात्पुरते ग्रामपंचायत कार्यालयात भरविण्यात येत आहेत. मात्र, ही तात्पुरती व्यवस्था किती काळ चालणार, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.

विजय पिदुरकर यांनीही वेधले होते लक्ष

माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनीही शाळेतील धोकादायक खोल्यांचा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने अखेर भिंत कोसळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कवडशी हे कोळसा खाणींच्या प्रभावक्षेत्रातील गाव असल्याने खनिज विकास निधीतून नवीन वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धोकादायक दोन खोल्यांचे निर्लेखन करून नवीन दोन वर्गखोल्यांना तातडीने मंजुरी द्यावी, तसेच तोपर्यंत सुरक्षित तात्पुरती व्यवस्था उभारण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.