दुचाकीला मागून धडक दिल्याचा जाब विचारल्याने तरुणाला मारहाण करून, त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार वणी शहरात घडला. याप्रकरणी प्रशांत नंदू गेडाम (वय २४, रा. शास्त्रीनगर, वणी) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रशांत गेडाम हे दुचाकीने कामावर जात होते. जटाशंकर चौकातील अंकुश मोबाईल शॉपीजवळ ते फोनवर बोलण्यासाठी थांबले असता मागून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवर तिघेजण बसले असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दुचाकीला धडक दिल्याबाबत जाब विचारला असता धडक देणाऱ्या तरुणाने प्रशांत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान हातातील लोखंडी कड्यासदृश वस्तूचा ओठाला मार लागल्याने रक्तस्राव झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, उपचारासाठी जात असताना एसपीएम शाळेजवळ आणखी दोघांनी त्यांना अडवून “इंद्रपालविरुद्ध पोलीस तक्रार केली तर जीवे मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत गेडाम यांच्या जबानी रिपोर्टवरून इंद्रपाल कैलास वागळकर (१९), कुंदन कैलास वागळकर (२५) दोन्ही रा. गोकुळनगर तथा एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments: