सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजातील एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असून, उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना चालना देता येते, असे प्रतिपादन ॲड. कुणाल चोरडिया यांनी केले.
वणी शहरातील सर्वोदय चौक येथील साई गणेश मंडळाच्या वतीने हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपतीनिमित्त आयोजित महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. गणरायाला निरोप दिल्यानंतर त्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जाणारा हा उत्सव भक्तिभावाने पार पडला.
यावेळी ॲड. कुणाल चोरडिया यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासोबतच सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करता येते, असेही म्हटले.
कार्यक्रमाला पत्रकार राजू धावंजेवार, परशुराम पोटे, डॉ. खापणे, सुनील इंदुवामन ठाकरे, जवाहर अरोरा आदी उपस्थित होते. यावेळी सुनील इंदुवामन ठाकरे यांनी हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपतीच्या परंपरेचा इतिहास उपस्थितांना सांगितला. उपस्थितांनीही प्रसंगानुरूप मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन संतोष कर्णेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे दिनेश दुर्गे, सफल आनंदवार, सुजल मांढरे, गणेश पारशिवे, राहुल आनंदवार, राहुल दांडेकर, तुषार भांडेकर, प्रवीण दुर्गे, पवन दुर्गे, रवी नान्ने, ईश्वर पारशिवे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.
भक्तीच्या माध्यमातून एकता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देत सर्वोदय चौकातील हाडपक्या गणपती उत्सवाने उत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

No comments: