प्रशांत चंदनखेडे वणी :-
मोमोज खाण्यासाठी बाहेर जाण्याच्या बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींना चक्क भाड्याच्या खोलीवर नेऊन त्यांच्यावर मद्यपानासाठी दबाव टाकल्याचा प्रकार वणीत उघडकीस आला आहे. मद्यपानानंतर एका मुलीला नशा चढली. त्यानंतरचा घटनाक्रम आठवत नसल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोन अल्पवयीन मैत्रिणी झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडल्या. पहिले झेरॉक्सचे दुकान बंद असल्याने त्या दुसऱ्या ठिकाणी गेल्या. याचदरम्यान एका मैत्रिणीच्या नातेवाईक तरुणीचा फोन आला. बाहेर फिरायला जाऊ आणि त्यानंतर तुम्हाला घरी सोडते, असे तिने सांगितले. मोमोज खाण्यासाठी जाण्याचे ठरल्याने दोघी तिच्यासोबत निघाल्या.
मात्र, आधी खोलीवर जाऊन मोबाईल चार्जिंगला लावू आणि नंतर मोमोज खायला जाऊ, असे सांगून त्यांना प्रगतीनगर परिसरातील भाड्याच्या खोलीवर नेण्यात आले. तेथे संबंधित तरुणीचा मित्र बाहेर गेला असल्याने दोघी त्याची वाट पाहत थांबल्या. काही वेळाने तो एका अनोळखी तरुणासह परतला. त्यांच्यासोबत बिअर आणि दारूच्या बाटल्याही होत्या.
दोन्ही मुलींनी आपण मद्यपान करत नसल्याचे सांगत घरी सोडण्याची विनंती केली. मात्र, संबंधित तरुणी, तिचा मित्र आणि त्याच्यासोबत आलेल्या अनोळखी तरुणाने मद्यपानासाठी आग्रह केल्याचे मुलीने जबाबात म्हटले आहे. ‘एक तरी ग्लास घ्या, आमचे पैसे वाया जातील,’ असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघींनीही एक-एक ग्लास मद्यप्राशन केले.
काही वेळाने पुन्हा ग्लास भरून देण्यात आला. परंतु सोबतच्या मैत्रिणीने नंतर मद्यपानास नकार दिला; मात्र फिर्यादी तरुणीच्या ग्लासमध्ये बिअर मिसळून देण्यात आल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. बियर मिसळलेले मद्यपान केल्यानंतर तरुणीला प्रचंड नशा चढली आणि तिला अस्वस्थ वाटू लागले.
मद्याची नशा चढल्याने अशा अवस्थेत तू घरी जाऊ नको, असे तिची मैत्रीण आणि संबंधित तरुणीने तिला म्हटले. त्यावर आपण मैत्रिणीच्या घरी झोपते, असे घरी सांगणार असल्याचे तिने त्यांना सांगितले. त्यानंतर नेमके काय घडले, याची आठवण नसल्याचे तिने तक्रारीत नमूद केले.
या प्रकरणात आपल्यासोबत कोणतेही वाईट कृत्य अथवा शारीरिक संबंध घडले नसल्याचेही मुलीने जबाबात स्पष्ट केले आहे. तसेच कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिने नमूद केले आहे. २८ ऑक्टोबर रोजी वडिलांच्या उपस्थितीत हा जबाब नोंदविण्यात आला.
दोन अल्पवयीन मुलींना मोमोज खाण्याच्या बहाण्याने खोलीवर नेल्यानंतर मद्यपानासाठी आग्रह करण्यात आल्याचा आरोप गंभीर आहे. या घटनेतील सर्व बाबींची पडताळणी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

No comments: