Latest News

Latest News
Loading...

विचारांची मशागत करणारी ‘बळीराजा व्याख्यानमाला’ आजपासून; दोन दिवस वैचारिक मेजवानी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ज्ञानाच्या कक्षा रुंदावून वैचारिक प्रगल्भतेला चालना देणारी वणीतील बहुचर्चित ‘बळीराजा व्याख्यानमाला’ यंदाही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. शिव महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेचे हे बारावे वर्ष असून, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर असे दोन दिवस विचारांची मेजवानी वणीकरांना अनुभवता येणार आहे. शहरातील बाजोरिया लॉन येथे सायंकाळी ७ वाजता व्याख्यानांना सुरुवात होणार आहे.

यंदाच्या व्याख्यानमालेत गांधी संशोधन केंद्राचे कार्यकारी विश्वस्त तथा शेतकरी जागर मंच, अकोला येथील संयोजक प्रशांत गावंडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील सक्रिय सहभाग, अभ्यासपूर्ण मांडणी आणि व्यापक वैचारिक दृष्टिकोन यामुळे त्यांच्या व्याख्यानांकडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे.

दोन दिवस, दोन महत्त्वपूर्ण विषय
शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी ‘गांधी एक चेतना’ या विषयावर प्रशांत गावंडे आपले विचार मांडणार आहेत. तर रविवार, १ नोव्हेंबर रोजी ‘स्वतंत्र भारताचा इतिहास’ या विषयावर त्यांचे दुसरे व्याख्यान होणार आहे. दोन्ही विषय ऐतिहासिक, सामाजिक आणि वैचारिक संदर्भांनी समृद्ध असून, त्यातून श्रोत्यांना नवी दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर राहणार आहेत.

विचारवंतांच्या मांदियाळीतून समाजप्रबोधनाचा प्रयत्न
बळीराजा व्याख्यानमालेच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रांतील अभ्यासू, प्रगल्भ आणि विचारवंत वक्त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांच्या वैचारिक मांडणीतून समाजात चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा, ज्ञानात भर पडावी आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

प्रशांत गावंडे यांचा शेतकरी चळवळीबरोबरच विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. देश-विदेशात त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली असून अनेक कार्यशाळांच्या माध्यमातूनही त्यांनी वैचारिक प्रबोधनाचे कार्य केले आहे. जनहिताच्या प्रश्नांवर उभारण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवत त्यांनी सामाजिक जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

केवळ मनोरंजन नव्हे, तर विचारांना चालना देणारे आणि समाजाला आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे व्यासपीठ म्हणून बळीराजा व्याख्यानमालेने वणीच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या ज्ञानवर्धक व्याख्यानमालेचा लाभ वणीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन शिव महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.