Latest News

Latest News
Loading...

वणीच्या पाणीप्रश्नावर मनसे आक्रमक; नवरगाव धरणाची पाइपलाइन व फिल्टर प्लांट तातडीने सुरू करण्याची मागणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

एकीकडे निर्गुडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शहरातील काही भागांतून गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वणी शहराच्या पाणीप्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ‘अमृत योजना’ अंतर्गत नवरगाव धरणावरून वणीसाठी स्वतंत्र पाइपलाइन आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसे नेते राजू उंबरकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने रखडलेल्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवरगाव धरणातून वणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकणे आणि फिल्टर प्लांट उभारणे, ही कामे शहराच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण उपाय ठरू शकतात. या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली असून निविदा व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तसेच निधीही नगर परिषदेकडे उपलब्ध असल्याचा दावा उंबरकर यांनी निवेदनातून केला आहे. असे असतानाही कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील अनेक भागांत अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त तसेच दूषित पाणी नळाद्वारे येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधील गळती किंवा गटारातील पाणी मिसळण्याच्या शक्यतेची तातडीने तपासणी करून दोषपूर्ण पाइपलाइन दुरुस्त कराव्यात आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उंबरकर यांनी केली.

याशिवाय शहरातील नाल्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून मानवी आरोग्याबरोबरच जलचरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते थेट नदीत मिसळणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

दुय्यम कामांपेक्षा पाणीप्रकल्पाला प्राधान्य द्या
निर्गुडा नदीचे पात्र कोरडे पडले असून वर्धा नदीची जलपातळीही घटत असल्याने आगामी काळात वणीवासीयांसमोर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर दुय्यम विकासकामांपेक्षा नवरगाव धरण ते वणी वणी शहर पाइपलाइन आणि फिल्टर प्लांट या प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका उंबरकर यांनी मांडली. दोन्ही कामे नेमकी केव्हा सुरू होणार, त्यांचे नियोजन काय आहे आणि कामे पूर्ण होण्याची कालमर्यादा किती असेल, याबाबत प्रशासनाने लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

मुख्याधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत या प्रश्नांवर सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. मात्र, चर्चेचे प्रत्यक्ष कामात रूपांतर होऊन पाइपलाइन आणि फिल्टर प्लांटचे काम कधी सुरू होते, याकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.

यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, राकेश वैद्य, महेश हदगावकर, मयूर गेडाम, परशुराम खंडाळकर, गोविंद थेरे, अनिल टोंगे, दिलीप मस्के, बंडू येसेकर, हरी कालेकर, अमर पाचभाई, रामदास निखाडे, धीरज पेचे, मनोज उरकुडे, संजय गौरकार, समीर देऊळकर, अंकुश भांडेकर, प्रवीण मांडवकर, पियुष बतखल आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.