वाहनांसमोर आडवा येणाऱ्या मद्यधुंद तरुणाचा अपघाती मृत्यू; तरुणाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल!
मद्याच्या अतिसेवनामुळे शुद्ध हरपलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा नदीच्या बेलोरा पुलाजवळ घडली. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अनोळखी असलेल्या मृत तरुणाची ओळख आता पटली असून, राम भीमराव मेश्राम (वय २६, रा. वाघापूर, यवतमाळ) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मेश्राम हा घुग्घुस परिसरातील एका कंपनीत पेंटिंगचे काम करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येते. २१ नोव्हेंबर रोजी त्याने मद्याचे अतिसेवन केल्याने तो प्रचंड नशेत होता. या अवस्थेत तो बेलोरा पुलाजवळील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर लोळू लागला. एवढेच नव्हे, तर कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांसह अन्य वाहनांच्या मार्गात वारंवार आडवा येऊ लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला अनेकदा बाजूला करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुन्हा रस्त्याच्या मध्यभागी जाऊन वाहनांसमोर आडवा होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याच धावपळीत वर्दळीच्या या मार्गावर अज्ञात वाहनाचा त्याला धक्का लागला. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. काही वेळ तो घटनास्थळीच पडून राहिल्यानंतर त्याची हालचाल बंद झाल्याचे लक्षात आले. यानंतर उपस्थित नागरिकांनी शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सुरुवातीला मृतकाची ओळख पटली नव्हती. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तो वाघापूर, यवतमाळ येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली.
या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून, त्यामध्ये तरुण मद्यधुंद अवस्थेत वाहनांच्या मार्गात येतांना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताची नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण याबाबत पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
भरधाव वाहतुकीच्या मार्गावर घडलेल्या या घटनेने मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावर वावरण्याचे गंभीर धोके पुन्हा अधोरेखित केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

No comments: