प्रशांत चंदनखेडे वणी :-
दिवाळीचा सण म्हणजे खरेदीची लगबग, बाजारपेठेतील गर्दी आणि उत्साहाचे वातावरण! मात्र, वणीच्या मुख्य बाजारपेठेत याच गर्दीला बेशिस्त ऑटो वाहतुकीची जोड मिळाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रवासी मिळविण्यासाठी काही ऑटोचालकांकडून मुख्य रस्त्यांवरच वाहनांचे थांबे केले जात असल्याने बाजारपेठेतील वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केली आहे. या प्रकाराला वेळीच लगाम घालावा, अन्यथा सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याचे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, पांडे मोबाईल शॉप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक या वर्दळीच्या मार्गावर काही ऑटोचालक प्रवासी भरण्यासाठी वारंवार फेऱ्या मारत असल्याचा आरोप आहे. रस्त्यावरच ऑटो थांबवून प्रवासी गोळा करण्याच्या प्रकारामुळे आधीच अरुंद असलेल्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची भर पडल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट बनत आहे.
वाहतूक कोंडीचा फटका केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर पायी चालणाऱ्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसत आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अशा कोंडीत रुग्णवाहिका किंवा अन्य आपत्कालीन वाहने अडकली, तर वेळेत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक नियोजन हा केवळ सोयीचा नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न बनला आहे.
विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद तपासून संबंधितांवर कारवाई करणे शक्य आहे. तरीही मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न कायम असल्याची बाब मनसे वाहतूक सेनेने उपस्थित केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी २ नोव्हेंबर रोजी वाहतूक उपशाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले. मुख्य बाजारपेठेत विनाकारण फेऱ्या मारणाऱ्या आणि रस्त्यावर अनधिकृतपणे ऑटो उभे करून प्रवासी भरणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिवाळीच्या काळात बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती, ऑटो थांब्यांचे नियोजन आणि रस्त्यावरील अनधिकृत थांबे हटविणे आवश्यक आहे. नागरिकांना खरेदीसाठी बाजारपेठेत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता मनसे वाहतूक सेनेच्या निवेदनानंतर वाहतूक पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

No comments: