Latest News

Latest News
Loading...

वणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जुगारी ताब्यात


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. प्रमोद घाटोळे रेस्ट हाऊसजवळील खुल्या जागेत पैशांच्या हारजितीचा मोठा जुगार सुरु होता. वणी पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून सहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान ५२ गंजी पत्ते, डावावरील व जुगाऱ्यांकडील मिळून १९ हजार ३६० रुपये रोख आणि दोन मोटरसायकल असा एकूण १ लाख २९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. प्रमोद घाटोळे रेस्ट हाऊसजवळ काही इसम खुल्या जागेत ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजितीचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अचानक छापा टाकताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला, तर सहा जण पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १४ हजार ६६० रुपये रोख मिळून आले. तसेच जुगाराच्या डावावर असलेले ४ हजार ७०० रुपये आणि ५२ गंजी पत्ते पोलिसांनी जप्त केले.

या कारवाईत विजय रामकृष्ण बोधाने (४०, रा. चिखलगाव), आकाश गणपत भुरकेवार (३४, रा. रंगारीपुरा, वणी), अजय सत्तू उईके (२२, रा. राजूर कॉलरी), दीपक किसन वाघमारे (४०, रा. दामले फैल), सतीश अरुण पडोळे (४५, रा. रवी नगर) आणि प्रमोद देवराव वैरागडे (३८, रा. तेली फैल) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर घटनास्थळावरून पळालेल्या जुगाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, घटनास्थळी दोन दुचाकीही पोलिसांच्या हाती लागल्या. यामध्ये आकाश भुरकेवार याची हिरो सुपर स्प्लेंडर (एमएच २९ एएक्स १७३९) किंमत अंदाजे ६० हजार रुपये, तर अजय उईके याची बजाज डिस्कव्हर (एमएच ३७ एफ ८३२०) किंमत अंदाजे ५० हजार रुपये, या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस हवालदार गेडाम, पोलीस शिपाई सागर व चालक पोलीस शिपाई गजानन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Powered by Blogger.