प्रशांत चंदनखेडे वणी :-
अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. शहर पोलीस व एलसीबी पथकाने मटका जुगारावर धाडसत्र राबवून शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारला. भाजी बाजारात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शहर पोलिसांनी तर एकता नगर परिसरातील नगर परिषदेच्या दुकान गाळ्यांमध्ये सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबी पथकाने धाड टाकून मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या सट्टेबाजांना रंगेहात अटक केली. या कारवाईत मटका साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरात अवैध व्यवसाय बोकाळल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने पोलिसांनी धाडसत्र राबवून अवैधधंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला. भाजी मंडईत मटका बाजार भरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी भाजी मंडईतील मटका अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच मटका लावणारे लोक पळत सुटले तर मटका पट्टी फाडणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळवतांना रंगेहात सापडलेल्या राहुल देविदास मुरकुटे (२६) रा. सर्वोदय चौक याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच्याजवळून पोलिसांनी मटक्याचे आकडे लिहिण्यासाठी वापरले जाणारे पावती बुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. मटका अड्डा चालवणाऱ्या मालकाचे नाव मात्र समोर आले नाही.
भाजी मंडई परिसरात अनेक दिवसांपासून मटका अड्डा सुरु असतांना पोलीस मात्र थातुरमातुर कारवाई करीत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही मटका अड्डे सुरुच राहत असल्याचे पाहायला मिळतात. मटका अड्डे चालविण्यात येणाऱ्या प्रमुख ठिकाणांवर पोलिसांचा फिक्स पॉईंट लावला जात असतांनाही त्याठिकाणी मटका जुगार चालतो तरी कसा, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजी मंडईत मटका बाजार भरत असल्याच्या तक्रारीनंतरही येथील मटका अड्डा कायमस्वरूपी बंद करण्याच्या दृष्टीने पोलिसांची कारवाई होतांना दिसत नाही.
भाजी बाजारातील या मटका अड्ड्यावर दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मटका लावणारे शौकीन घुटमळत असतात. त्यामुळे भाजी बाजारात येणाऱ्या नागरिकांना खास करून महिलांना मटकाबहाद्दरांचा घोंगाट आणि त्यांच्यातील घाणेरड्या शब्द संवादाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तेंव्हा भाजी बाजारातील मटका अड्डा पोलिसांनी कायस्वरूपी बंद करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
एलसीबी पथकानेही एकता नगर परिसरातील नगर पालिकेच्या दुकान गाळ्यात सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धडक कारवाई केली. एम.एस. बाईक पॉईंट जवळ मटका अड्डा सुरु असल्याच्या माहिती वरून एलसीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. तेथे काही इसम मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळतांना दिसून आले. पोलिसांना पाहताच मटका लावणारे पळत सुटले तर मटका पट्टी फाडणारे चार आरोपी पथकाच्या हाती लागले.
छोट्या पावत्यांवर मटक्याचे आकडे लिहून देत लोकांकडून पैसे घेतांना रंगेहात सापडलेल्या इम्रान खान अजरउल्ला खान (४३) रा. एकता नगर, मोहम्मद शोएब मोहम्मद सादिक (३२) रा. मारेगाव, जानू अनिल शिंगारे (२४) रा. साईनगरी वणी, वसिम शेख हनीफ शेख (२८) रा. पंचशील नगर यांना ताब्यात घेत पथकाने त्यांच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांच्याजवळून मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण १२७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबी पथकाचे सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, किशोर आडे, सलमान खान, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली.

No comments: