इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीच असाध्य नसतं. जिद्द उराशी बाळगली की यशही खेचून आणता येतं. जिद्द, चिकाटी व परिश्रम ही यशाची त्रिसूत्री आहे. पराक्रम गाजवायचा असेल तर हालाकीच्या परिस्थितीने खचून चालत नाही. परिस्थितीतून उभारावं लागतं. पूरक परिस्थिती नसली तरी शिक्षणाची आवड असली पाहिजे. शिक्षणाचा ध्यास घेतला की, अभ्यासाची आपसूकच सवय जडते. मग प्रतिकूल परिस्थितीचाही विचार मनाला शिवत नाही. परिस्थितीचा बगलबुवा करीत शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांपुढे सोनम रघुवीर चंदेल या विद्यार्थिनीने एक आदर्श ठेवला आहे. सोनमला १२ वि विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के गुन मिळाले आहेत. आज २५ मे ला उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे (एचएससी) ऑनलाईन निकाल जाहीर झाले. या परीक्षेत लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनम चंदेल हिला विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के एवढे गुन मिळाले आहेत. पंचशील नगर येथील चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या सोनम हिने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तुंग भरारी घेतली आहे. विद्यार्जनाची गोडी असलेल्या सोनमने पुस्तकालाच आपला गुरु मानला. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने तिने सर्वांचेच डोळे दिपविले आहे. घरची परिस्थिती बेताची होती. पण तिला भूक शिक्षणाची होती. शिकण्याची जिद्द उरी बाळगली की, कठीण परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते. कठीण परिस्थितीतूनही यशस्वी जीवनाची पायाभरणी करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यात सोनम चंदेल हे एक नाव जुडलं आहे. आपल्या बुद्धीतेजातून तिने गुणवत्तेची चमक दाखविल्याने सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंचशील नगर येथे एका छोटाशा घरात वास्तव्य करणाऱ्या सोनमची स्वप्न मात्र मोठी आहेत. तिला शैक्षणिक भवितव्य घडवायचं आहे. पोटाला भाकर नसली तरी चालेल पण शिक्षणाची भूक कमी व्हायला नको, हे महापुरुषाचे विचार आहेत. शिक्षणाला वाघिणीचं दूध संबोधणाऱ्या प्रज्ञासुर्याने शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. आज हालाकीच्या परिस्थीतूनही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भवितव्य घडवलं असून ते यशस्वी जीवनाचे पाईक झाले आहेत. सोनम ही देखील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. वडील पाणी पुरी व भेळ विक्रीचा व्यवसाय करून अल्पशा मिळकतीत कुटुंबाचा गाडा हाकतात. याच चंदेल कुटुंबातील सोनम ही शिक्षणात चमकली. १२ वी विज्ञान शाखेतून ८६.३३ टक्के गुण घेऊन ती वणी तालुक्यात तिसरी आली. शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी असून या महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीतिल अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. सोनमने आपल्या यशाचे श्रेय्य शिक्षणाला प्राधान्य देणारे आई वडील व वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले आहे. सोनम चंदेल या विद्यार्थिनीने प्रतिकूल परिस्थितीतही गुणवत्ता प्राप्त केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात येत आहे. परिस्थितीचा बगलबुवा न करता यशाची पायरी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे लोकसंदेश न्यूज अभिनंदन करीत आहे.
प्रशांत चंदनखेडे वणी
No comments: