Latest News

Latest News
Loading...

कोरड्या दुष्काळाच्या सावटात आलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून आला पाऊस, दीर्घ विश्रांतीनंतर लावली हजेरी, बळीराजा सुखावला

प्रशांत चंदनखेडे वणी 

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला पहायला मिळतो. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. घाम गाळून जमिनीतून मोती उगविणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच निराशा येते. शेतात राब राब राबूनही पेरलेलं उगवेल की नाही, आणि उगविलेलं जगेल की नाही, या विवंचनेतच तो दिवसरात्र अडकलेला असतो. शेती बेभरवशाची असतानाही तो मात्र आपला विश्वास डळमळू न देता दरवेळी नव्या जोमाने शेती कसतो. कारण त्याची मातीशी नाळ जुळलेली असते. निसर्गाने दगा दिला तरी तो मातीशी इमान राखतो, व नैराश्य दूर सारत परत नव्या उम्मेदीने शेती कसतो. शेती हा शेतकऱ्याचा कणा असल्याने कितीही संकट आलं तरी तो शेती कसनं मात्र थांबवत नाही. निसर्ग कितीही कोपला तरी शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत नाही. आणि म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. आस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत शेत फुलविणाऱ्या शेतकऱ्याला परत एकदा निसर्गाने छळले. अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. शेतातली पिकं करपायला लागली होती. नुकतीच उगवलेली पिकं मान टाकू लागली होती. कपाशी, तूर, सोयाबीनची झाडं सुकण्याच्या मार्गावर असतांनाच निसर्गाची कृपादृष्टी झाली, व रुसलेला पाऊस परतल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्याने शेतकरी नैराश्येच्या गर्तेत आला होता. शेतातील पिकं सुकू लागली असतांनाच पाऊस धावून आला. शनिवार पासून परत पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. 

यावर्षी पावसाचं आगमन थोडं उशिराच झालं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार व शासनाच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनीही उशिराच पेरणी हाती घेतली. पण तरीही शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावाच लागला. काही ठिकाणी शेतात डौलदार पिकं दिसतात, तर काही ठिकाणी शेतातील पिकांची स्थिती अतिशय वाईट आहे. असे असले तरी काल पासून पडत असलेल्या पावसाने पिकांना बऱ्यापैकी तारले आहे. शेती ही बेभरवशाची असली तरी शेतकरी मात्र शेतीकडे कधीही पाठ फिरवत नाही. निसर्गानं कितीही नुकसान केलं तरी दरवर्षी तो नव्या दमानं शेती करतो. घामाच्या धारांमध्ये अश्रू लपवून शेतात राबतो. राब राब राबूनही हाती शिल्लक काही पडत नाही. जेमतेम उत्पनातून जीवन जगण्याची कला साधावी लागते. शेतीच्या लागवडीचा खर्च आता प्रचंड वाढला आहे. शेतीच्या मशागतीचा खर्चही वाढला आहे. बी-बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. निंदण, खुरपण व डवरणालाही मोठा खर्च येतो. खतांच्या किमती वाढल्या आहेत. कीटक नाशक व फवारणीचाही खर्च वाढला आहे. मजुरांच्या मंजुऱ्याही प्रचंड वाढल्या आहेत. कधी वेचणीला मजूर मिळतात तर कधी मजूरच मिळत नाही. शेतीचा खर्च प्रचंड वाढला असता तरी शेतमालाला हमीभाव मात्र मिळत नाही. जेमतेम भाव मिळत असल्याने मशागतीचा खर्च वजा करता हातात दमडीही शिल्लक रहात नाही. जगण्याची वाट शोधतांना मरणाचा दरवाजा दिसावा, ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची झाली आहे. निसर्ग तर छळतोच, पण सरकारही शेतकऱ्यांना दिलासा देत नाही. केळाच्या पानावर भाताचं शीत द्यावं तशी शेतकऱ्यांना मदत दिली जाते. मदतीच्या नावावर एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. जगाचा पोशिंदा असलेला कास्तकार हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असतांना शासनकर्त्यांच्या काळजाला मात्र पाझर फुटत नाही. शेतमालाला भाव मिळण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला शेवटी पडलेल्या भावातच माल विकावा लागला. शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात माल विकल्यानंतर भाव वाढ करण्यात आली, आणि व्यापारी मालामाल झाले. शेतकऱ्यांना नेहमीच अशा परिस्थितीतून जावं लागतं. त्यांच्या व्यथा कुणाला कळत नाही. त्यांची दैना झालेली असतांना त्यांना थातुर मातुर मदत देऊन त्यांचं बोळवण केलं जातं. यावर्षीही कोरडा दुष्काळ पडतो की काय, या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना काल पासून पावसाने परत हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

No comments:

Powered by Blogger.