प्रशांत चंदनखेडे वणी
शेतातील कामे आटपून बैलबंडीने घराकडे परतत असतांना अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असतांनाच अचानक बैलबंडीवरच वीज कोसळली. यात सुवर्णा संजय कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेतकरी व शेतमजूर बेशुद्ध झाले. शेतकरी पती, पत्नी व शेतमजूर असे तिघे जण बैलबंडीने घराकडे जात असतांना दुपारी २ वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरु झाला व अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या आकस्मिक घटनेत महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. तर शेतकरी व शेतमजूर नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले.
दुसरी घटना मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत घडली. शेतात कामे करीत असतांना दुपारी ४ वाजता अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतकरी, त्यांची पत्नी व वडिलांनी शेतातीलच गोठ्यात आश्रय घेतला. तिघेही जण गोठ्यातील खाटेवर बसून असतांना अचानक त्याठिकाणी वीज कोसळली. वीज कोसळताच मनोज पांडुरंग गोहोकार हा खाटेवर निपचित पडला. त्याच्या शरीराची हालचाल बंद पडल्याने कुटुंबीयांनी लगेच त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर दमदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असतांनाच नैसर्गिक आपत्तीने एक शेतकरी व एका शेतकऱ्याच्या पत्नीचा बळी गेल्याने परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे. शेतकऱ्यांना शेत कसतांना मोठी जोखीम पत्करावी लागते. वादळवाऱ्यांचा मारा व पावसाच्या धारा अंगावर झेलतांनाच जिवाचीही जोखीम पत्करावी लागते. जीवावर उद्धार होऊन शेतात काम करावं लागतं. शेतात राबताना कधी कोणतं संकट ओढावेल, याची शाश्वतीच नसते. त्यामुळे शेती हा जिगरीचा आणि जिकिरीचा व्यवसाय झाला आहे.

No comments: