Latest News

Latest News
Loading...

शिरपूर पोलिसांनी अतिशीघ्र लावला चोरीच्या घटनेचा छडा, अवघ्या काही तासांतच केले आरोपीला जेरबंद

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चेंडकापुर या गावातील घरफोडी प्रकरणाचा अतिशीघ्र छडा लावून शिरपूर पोलिसांनी चोरट्याला अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील रोख रक्कम लंपास केली होती. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त होताच शिरपूर पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासांतच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. विनोद सूर्यभान इंगोले (३०) रा. चेंडकापुर असे या अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. 

चेंडकापुर या गावात राहणाऱ्या गीता धनीराम अहिरवार या महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना ४ सप्टेंबरला उघडकीस आली. महिलेने घरी चोरी झाल्याची तक्रार ४ सप्टेंबरला रात्री १०.५२ वाजता शिरपूर पोलिस स्टेशनला नोंदविली. ५ सप्टेंबरला दुपारी २ वाजता पोलिसांनी चोरट्याला अटक करून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. सदर महिला ही मजुरीचे काम करते. तिने मजुरीच्या मिळकतीतून जमा केलेली रक्कम कापडात गुंडाळून घरातील तांदळाच्या कोठीत ठेवली होती. १४ ऑगस्टला ही महिला मुलीच्या भेटीसाठी म्हणून मोहदा या गावाला गेली. दरम्यान कुलूप बंद घराला चोरट्याने टार्गेट करून घरात ठेवलेली २५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. ४ सप्टेंबरला महिला जेंव्हा घरी परतली, तेंव्हा तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले. तिने घरात जाऊन बघतले तर घरातील वस्तू व सामनाही अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. घरातील हे दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तिने तांदळाच्या कोठीचे झाकण उघडून बघीतले असता त्यात ठेवलेले २५ हजार रुपये देखील तिला तेथे आढळून आले नाही. अज्ञात चोरट्याने चोरीचा डाव साधून घरातील २५ हजार रुपये चोरून नेल्याचे तिच्या लक्षात येताच तिने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. 

तक्रार प्राप्त होताच शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपासचक्रे फिरवीत अवघ्या काही तासांतच चोरट्याला जेरबंद केले. त्याने २५ हजार रुपये चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्या जवळून चोरीतील २४ हजार रुपये ही रक्कम जप्त केली आहे. सदर रक्कम ही मजूर महिलेला परत करण्यात आली आहे. मोलमजुरी करून चार पैसे शिल्लक पडणाऱ्या मजुरांच्याही पैशांवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. मजूर महिलेच्या बंद घराला टार्गेट करून चोरट्याने चोरून नेलेली रक्कम पोलिसांच्या शीघ्र तपासाने परत मिळाल्याने महिलेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिसांनी केला. 


  

No comments:

Powered by Blogger.