त्या महिलेची हत्याच झाली असावी, शिरपूर पोलिसांनी वर्तविला कयास , गौण खनिज खदानीत आढळला होता महिलेचा मृतदेह
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मोहदा गावालगत असलेल्या एका गौण खनिज उत्खनन करणाऱ्या खदानीत पाणी साचून तयार झालेल्या तळ्यात आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. महिलेचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने घातपाताचा संशय बळावला होता. शिरपूर पोलिसांनी घटनेच्या खोलात जाऊन तपास केला असता तिची हत्या करून मृतदेह खदानीत फेकल्याची शक्यता वर्तविली आहे. पोलिसांनी प्रथम दर्शनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सरिता राजन पंडित (२२) असे या मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिस सत्यता पडताळण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे.
मोहदा गावालगत गौण खनिजाच्या (डोलोमाइट) अनेक खाणी आहेत. या खाणीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. पावसाळ्यात या खदानींमध्ये पाणी साचत असल्याने उत्खनन बंद ठेवले जाते. परंतु खान परिसरात कुणाचा वावर होणार नाही, याची जराही खबरदारी घेतली जात नाही. गौण खनिज उत्खननाचे कंत्राट मिळालेले कंत्राटदारही खदान बेवारस सोडून पावसाळाभर गायब असतात. गौण खनिजाचे खोलवर उत्खनन केले जात असल्याने खोलगट भाग तयार होऊन पावसाळ्यात या खदानीला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या खदानीत साचलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसला. ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह तलावाबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता मृतक महिला ही याच भागात मजूर म्हणून कामाला असल्याचे पोलिसांना कळाले. या महिलेच्या पतीला दोन बायका असून काही दिवसांपूर्वी मृतक महिलेशी तिच्या पतीचा वाद झाल्याचे समोर आले आहे. महिलेचा पती राजन पंडित हा रहिवाशी वस्तीत आढळून न आल्याने संशयाची पाल चुकचुकत आहे. त्यानेच आपल्या पत्नीचा खून तर केला नसावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने महिलेचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी महिलेचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तविली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्याचा शिरपूर पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहे. कौशल्यपूर्ण तपासातून गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हगारांना तुरंगवारी घडविणारे शिरपूरचे ठाणेदार गजानन कारेवाड हे या रहस्यमय घटनेचाही लवकरच पर्दाफाश करतील ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांनी वेगवान तपास सुरु केला असून लवकरच या घटनेची सत्यता समोर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. घटनेचा तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन कारेवाड व शिरपूर पोलिस करीत आहे.

No comments: