न्यायासाठी सलग सहा दिवसांपासून सुरु आहे कुटूंबाचे उपोषण, मात्र त्यांच्यावरच होत आहे खंडणी मागितल्याचा आरोप
प्रशांत चंदनखेडे वणी
गर्भधारणा झालेल्या महिलेची नियमित तपासणी केल्यानंतर गर्भवाढी नुसार सोनोग्राफीही करण्यात आली. शहरातील एका तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही सोनोग्राफी करण्यात आली. त्यांनी गर्भाची वाढ सुरळीत होत असल्याचे सांगितले. गर्भातील बाळ स्वस्थ, सुदृढ व निरोगी असल्याचेही सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी तपासणी व योग्य उपचार घेतानाच नियमित कालावधीत सोनोग्राफी देखील करण्यात आली. तरीही अघटितच घडले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर गर्भातिल बाळ सुस्थितीत असल्याचे निदान दिले होते. पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याची शारीरिक अवस्था फारच दयनीय होती. अविकसित व विचित्र शारीरिक अवयव असलेलं बाळ महिलेच्या पोटी जन्माला आलं. त्या बाळाची शारीरिक अवस्था पाहून जन्मदात्यांनाही अश्रू अनावर झाले. सोनोग्राफीत बाळ निरोगी असल्याचे प्रमाण देणाऱ्या डॉक्टरांना पालकांनी नवजात बाळाची अवस्था सांगितल्यानंतर डॉक्टारांनी घुमजाव केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बाळ किती काळ जगेल याचीही शाश्वती राहिली नव्हती. बळावर उपचार सुरु असतांना एक एक दिवस जन्मदात्यांच्या काळजाचे ठोके चुकवीत होता. अखेर नवजात बाळाचा श्वास थांबला. आई वडिलांना दुःख अनावर झालं. त्यांनी न्यायासाठी टाहो फोडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचा आरोप करीत पालक व नातेवाईकांनी त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली. कुटुंबीय, नातेवाईक व काही संवेदनशील नागरिकांनी डॉक्टरांच्या खाजगी रुग्णालयावर मोर्चा देखील काढला. पोलिस स्टेशनला तक्रार दिली, पत्रकार परिषदेतून व्यथा देखील मांडली. पण पॉवर पुढे त्यांचा आवाज दाबल्या गेला. शेवटी त्यांनी न्यायासाठी आमरण उपोषण मांडलं. पण उपोषण मंडपाकडे सामाजिक जाण जपणारा कुणी फिरकलाच नाही. एरव्ही लहान सहान प्रकरण उचलून धरणारी राजकीय मंडळी त्यांना सांत्वना देण्याकरिताही आली नाही. आज सहा दिवसांपासून भर पावसात ओल्या बाळंतीणीसह तिचं अख्ख कुटुंब उपोषणाला बसलं आहे. पण समाजमन जराही हेलावलं नाही. उपोषण मंडपात बसलेली महिला आज चक्कर येऊन पडली, तिची शुद्ध हरपली. पण येथे संवेदनशीलताच हरपली असल्याने साथीला येणार तरी कोण, न्यायासाठी कोण त्यांच्या बाजूने उभे राहणार. येथे तर गेम प्लॅन तयार करून उलट्या बोंबा मारल्या जातात. न्याय मागणाऱ्यांच्या विरोधातच शहानिशा न करता गुन्हे दाखल केले जातात. ओढयात डुबकी कशाला मारायची म्हणून सर्वांनीच प्रवाहाच्या दूर राहणे पसंत केले आहे. पण तरीही कुटुंबीयांचा न्यायासाठी एकाकी लढा सुरु आहे. अन्यायाविरोधात एका कुटुंबाचा लढा सुरु असतांना लढा म्हणणारा कुणीच त्यांच्या पाठीशी उभा राहतांना दिसत नाही. कारण पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात जाऊन न्यायाची मागणी केल्यास कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षाच करणे व्यर्थ असल्याचे आता उपोषणकर्त्यांना कळून चुकले आहे.
शहरातील भगतसिंग नगर परिसरात वास्तव्य करणारं एक साधारण कुटुंबं अन्यायाच्या विरोधात उभं ठाकलं आहे. नरेंद्र शंकर बुजाडे यांची पत्नी भाग्यश्री ही गरोधर राहिल्याने त्यांनी नियमित तपासणी व उपचार घेणे सुरु केले. त्यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्रावर सोनोग्राफी करून घेतली. गर्भवाढी नुसार सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टारांनी पोटातील बाळ सुखरूप असल्याचे निदान दिले. मात्र वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार व सोनोग्राफी केल्यानंतरही अविकसित बाळ जन्माला आलं. विचित्र शारीरिक अवयव असलेलं बाळ जन्माला आल्याने जन्मदाते चांगलेच दुःखी झाले. सोनोग्राफीत निदान देतांना गर्भातील बाळ निरोगी व स्वस्थ होते, मग जन्माला आलेलं बाळ अविकसित व विकलांग कसं, या विवंचनेत त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला असता डॉक्टरांनी घुमजाव केले. उलट त्यांनी कुटुंबीयांनाच तंबी दिली. बाळाची अवस्था अतिशय नाजूक असल्याने आई वडिलांनी नागपूर येथे त्याच्यावर उपचार केले. पण काही उपयोग झाला नाही. एका महिन्याच्या कालावधीतच बाळ दगावलं. बाळ दगावल्याने नातेवाईक चांगलेच संतप्त झाले. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. डॉक्टरांवर कार्यवाही होत नसल्याचे पाहून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सहा दिवसांपासून त्यांचं न्यायासाठी उपोषण सुरु आहे. पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. उपोषण मंडपातील महिला आज चक्कर येऊन बेशुद्ध झाली. पण पाषाण व्ह्रदयी प्रशासनाला मात्र पाझर फुटला नाही.
डॉ. महेंद्र लोढा हे तज्ज्ञ डॉक्टर असून त्यांचे शहरात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय देखील आहे. ते ग्रामीण रुग्णालयातही मानव सेवी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गर्भवती महिलांवर उपचार करायचे. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. शहरातील दोन गर्भवती महिलांनी त्यांच्याकडे सोनोग्राफी केली. नियमित तपासणी व उपचारही घेतले. दोनही महिलांच्या गर्भातील बाळ सुखरूप व निरोगी असल्याचे निदान सोनोग्राफी केल्यानंतर डॉ. लोढा यांनी दिले. वैशाली महेश मुके व भाग्यश्री नरेंद्र बुजाडे अशी या महिलांची नावे आहेत. भाग्यश्रीच्या पोटी जन्माला आलेलं बाळ अविकसित व विचित्र शारीरिक अवयव असलेलं होतं. तर वैशाली यांनी जन्म दिलेल्या बाळाच्या उजव्या पायाचे हाड अगदीच छोटे आहे. डॉ. लोढा यांनी दोनही महिलांच्या सोनोग्राफी केल्यानंतर बाळ निरोगी असल्याचे निदान दिले होते. डॉ. लोढा यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे पहिल्या लेव्हलची सोनोग्राफी मशीन आहे. त्यांनी दोनही गर्भवती महिलांना ३डी सोनोग्राफी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे. पण या दोनही महिलांच्या पतींनी डॉ. लोढा यांच्या कथा कथनाचा इन्कार केला आहे. डॉ. लोढा यांनी बेजबाबदारपणे रुग्ण हाताळल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कार्यवाही करण्याची दोनही कुटुंबीयांनी मागणी केली आहे. दोनही कुटुंबाजवळ वेळोवेळी सोनोग्राफी केल्याची रिपोर्ट आहे. उपचार घेतल्याची कागदपत्रे आहेत. वैशाली यांचे पती महेश मुके यांच्याजवळ तर डॉक्टरांच्या संभाषणाच्या ऑडियो क्लिप देखील असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
डॉ. महेंद्र लोढा यांनी बुजाडे कुटुंबियांवर खंडणी मागितल्याचा आरोप करीत मोबाईल वरील संभाषणाची ऑडियो क्लिप सादर केली आहे. बुजाडे कुटुंबीयांनी २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत तशी त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. परंतु बुजाडे कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. आमच्या कुटुंबातील कोण्याही व्यक्तीने खंडणी मागितली नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ऑडियो क्लिप मधील आवाजाची शहानिशा करून गुन्हे दाखल करायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे. ऑडियो क्लिप मधील आवाज कुणाचा, याची आधी पडताळनी करायला हवी होती, ही प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ. लोढा यांनी याआधीही तत्कालीन पोलिस निरीक्षकांवर खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. पण ते सिद्ध करू शकले नाही. त्यांच्यावर गर्भपाताचा आरोप झाल्याचे देखील ऐकायला मिळाले. मग नेमके त्यांच्या सोबतच असे प्रसंग का घडतात, हा प्रश्न उपोषणकर्त्या कुटुंबाने उपस्थित केला आहे. ते पोलिस निरीक्षकांवरच खंडणी मागितल्याचा आरोप करू शकतात, मग आम्ही तर सामान्य व्यक्ती आहोत. ते त्यांच्या विरुद्ध उठणारा आवाज दाबण्याकरिता कुठलीही शक्कल लढऊ शकतात, ही उपरोधक प्रतिक्रिया देखील उपोषण कर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे.





No comments: