Latest News

Latest News
Loading...

ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता ठेवली टिकवून, संजय खाडे

प्रशांत चंदनखेडे वणी 

कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खेळ असून ग्रामीण भागाने कबड्डीची खरी लोकप्रियता टिकवून ठेवली. ४० पेक्षाही जास्त देशात कबड्डी हा खेळ खेळला जातो. प्रो-कबड्डीने हा खेळ घरोघरी पोहचविला आहे. त्यामुळे या खेळाला आता ग्लॅमर रूप प्राप्त झालं असून यात व्यावसायिकता आली आहे. तेंव्हा ग्रामीण भागातील खेळाडूंनी कबड्डी या खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मनोगत श्री रंगनाथ निधी अर्बन लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील भालर येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भालर येथिल सिताई नगरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ३१ डिसेंबरला पार पडला. यावेळी संजय खाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कबड्डीच्या लोकप्रियतेचे वर्णन केले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, स्त्री सन्मान शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर, संजय देठे, सुनिल वरारकर, जगन जुनगरी, आशिष खुलसंगे, फैजल बशीर खान, विनोद ढुमणे, अंकुश बोढे, हुसैन बाशा, बाबाराव हेपट, मोईन खान, विलास कालेकर, बबन वाटेकर आदी उपस्थित होते. 

ही कबड्डी स्पर्धा तीन गटांत विभागण्यात आली आहे. पहिला गट हा खुला पुरुष गट असून दुसऱ्या गटात पुरुषांसाठी ६० किलो वजनाची अट ठेवण्यात आली आहे. तर तिसरा गट हा महिलांचा आहे. खुल्या पुरुष गटाकरिता पाहिलं बक्षिस ४० हजार रुपये, दुसरं बक्षिस ३० हजार रुपये, तिसरं बक्षिस २० हजार रुपये तर चौथं बक्षिस १० हजार रुपये ठेवण्यात आलं आहे. ६० किलो पुरुष गटासाठी प्रथम बक्षिस ३० हजार, द्वितीय २० हजार तर तृतीय बक्षिस १५ हजार रुपये राहणार आहे. तर महिला गटांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार व ७ हजार रुपयांचे रोख बक्षिसे दिली जाणार आहे. कबड्डी स्पर्धेचा उद्घाटनपर सामना महिला गटातील खैरगाव विरुद्ध भालर या संघात रंगला. या सामन्यात खैरगाव संघ विजयी ठरला. महिला गटात सलग दोन दिवस सामने रंगले. सोमवारी रात्री टीएसओ वणी व भोपाळ या संघात अंतिम सामना झाला. यात वणी महिला संघाने बाजी मारली. टीएसओ वणी संघ महिला गटातून प्रथम विजयी संघ ठरला. या स्पर्धेत १६ महिलांचे संघ सहभागी झाले होते. २ जानेवारी पासून पुरुषांच्या खुल्या गटातील कबड्डी सामन्यांना सुरुवात होणार आहे.  

जय गुरुदेव सेवा मंडळ भालर यांच्या विद्यमाने व बाबा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था भालर यांच्या सहकार्यातून तथा स्व. हेमंत खंगार यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. 


No comments:

Powered by Blogger.