अवैध विक्री करिता दारू घेऊन जाणाऱ्या आरोपीच्या डीबी पथकाने आवळल्या मुसक्या, येथे अवैध धंद्यांची खोलवर रुतली आहेत पाळेमुळे
प्रशांत चंदनखेडे वणी
अवैध विक्री करिता मोटारसायकलने दारू घेऊन जाणाऱ्या एका अवैध दारू विक्रेत्याला डीबी पथकाने अटक केली आहे. विना परवाना दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या या आरोपी जवळून पोलिसांनी ५३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही आज २ जानेवारीला दुपारच्या सुमारास करण्यात आली. प्रियानंद अभीमन्यू येसंबरे रा. राजूर (कॉ.) असे या अवैध विक्री करिता दारू घेऊन जातांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजूर (कॉ.) येथे अवैध धंद्याचं जाळं पसरलं आहे. मटका जुगाराबरोबरच अवैध दारू विक्रीही या ठिकाणी जोमात सुरु आहे. काही अवैध दारू विक्रेत्यांकडून तर बियरबार सारखी सुविधा पुरविली जात आहे. दिवस उजाडत नाही तोच राजूर येथे अवैध दारू विक्रीला सुरुवात होते. या ठिकाणी अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. राजूर या गावात अवैध दारूचा महापूर वाहत असतांना कार्यवाही मात्र नगण्य दिसत आहे. त्यामुळे संबंधितांचे अवैध दारू विक्रेत्यांशी साटेलोटे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. राजूर (कॉ.) येथे मटका जुगारही मोठ्या प्रमाणात खेळला जात असून मटका बहाद्दरांनी ठिकठिकाणी आपले अड्डे थाटले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांना अभय कुणाचं हा देखील आता चर्चेचा विषय बनला आहे. पोलिस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही असे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश असल्याचे सांगितले जात असले तरी या ठिकाणी अवैध धंद्यांची पाळेमुळे खोलवर रुतली आहे. काही पोलिस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. अनेक वर्षांपासून त्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. तर काहींच्या अल्पावधीतच बदल्या करण्यात आल्या आहेत. दुकानावर जेसीबी चालला आणि तपासकर्त्याचीच तडकाफडकी बदली करण्यात आली. परंतु तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केलेल्या पोलिसांना मात्र परत तीच जबाबदारी देण्यात आली आहे. ते साहेबांना कानमंत्र देऊन आपला बॅकलॉग पूर्ण करीत आहेत. शहरात त्यांचे अनेक हित चिंतक असून ते हितसंबंध जोपासण्याला अधिक महत्व देत असल्याने अवैध धंद्यांना पाठबळ मिळत आहे.
पोलिस जमादार विकास धडसे यांच्या नेतृत्वातील डीबी पथकाला राजूर (कॉ.) येथे मोटारसायकलने अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. राजूर (कॉ.) येथिल प्रियानंद येसंबरे हा अवैध विक्री करिता दारूची खेप घेऊन जाणार असल्याच्या माहिती वरून शहरात गस्त घालणाऱ्या डीबी पथकाने गांधी चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदार शुभम सोनुले यांना टागोर चौक येथे सापळा रचण्यास सांगितले. शुभम सोनुले यांनी टागोर चौक येथे उभे राहून सांगितलेल्या वर्णनाच्या मोटारसायकलवर बारीक लक्ष ठेवले. काही वेळातच त्यांना पांढऱ्या रंगाची होंडा ऍक्टिव्हा ही मोपेड येतांना दिसली. त्यांनी दुचाकी चालकाला थांबवून त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. शुभम सोनुले यांनी मोपेड बाईकची डिक्की उघडून बघितली असता त्यात विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी प्रियानंद येसंबरे या अवैध दारू विक्रेत्याला ताब्यात घेत दारूचा साठा जप्त केला. त्याच्यावर मदकाच्या कलम ६५(अ), सहकलम १८४, १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून मोपेड दुचाकी (MH २९ BX ५११६) व विदेशी दारू असा एकूण ५३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून डीबी पथकाचे विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम यांनी केली.

No comments: