कम्युनिस्ट नेते कॉ. शंकरराव दानव काळाच्या पडद्याआड
प्रशांत चंदनखेडे वणी
यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते तथा शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठविणारे कॉ. शंकरराव दानव हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शासन व प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांवर तीव्र प्रहार करतांनाच आंदोलने उभारून अन्यायाला वाचा फोडणारे कॉ. शंकरराव दानव हे अनंतात विलीन झाले आहेत. आज ३१ जानेवारीला पहाटे ६ वाजता त्यांचं निधन झालं. २७ जानेवारीला व्ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतांना आज पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला, आणि मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज संपली. मृत्यू समयी त्यांचं वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या जाण्याने शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा हक्काचा आंदोलनकर्ता हरपला आहे. त्यांच्या अशा या अकाली निधनाने जनता दुःखसागरात बुडाली आहे. पक्ष नेते व कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने कम्युनिस्टांच्या चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कॉ. शंकरराव दानव हे सर्वांना परिचित व स्मरणात असलेलं नाव. शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा नेता तथा आंदोलकारी म्हणून त्यांची जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात ओळख. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांचा परिचय. त्यांनी विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, फेरीवाले, कोळसा कामगार, नगर परिषद कर्मचारी, जिनिंग कामगार, चुनाभट्टी कामगार, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका तथा तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी आंदोलनं उभारून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. शेतकरी व कामगारांवर होणारा अन्याय त्यांना सहन व्हायचा नाही. अन्यायाविरुद्ध ते आक्रमक पवित्रा घ्यायचे. अन्यायविरुद्धची त्यांची आंदोलनंही प्रखर असायची. त्यांनी उभारलेल्या आंदोलनांनी प्रशासनही कधी हादरून जायचं. प्रशासनाने वेळोवेळी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. कम्युनिस्टांचं जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व व सभा संमेलनांचं प्रखर वक्तृत्व त्यांच्या जाण्याने हरपलं आहे. लाल सलामची डरकाळी फोडणारा हा धेय्यवादी व निडर नेता आज सर्वांना सोडून गेला. सर्वसामान्यांसाठी निरंतर झटणारा व त्यांच्या हक्कासाठी सदैव लढणारा हा कम्युनिस्ट नेता अन्यायाविरुद्ध हुंकार भरून निघून गेला आहे. त्यांचा आंदोलनकारी बाणा नेहमीच कम्युनिस्टांना व जनतेला प्रेरणा देत राहील.
शंकरराव दानव यांचा जन्म १९४८ साली एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी गरिबीचे चटके सहन करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. नंतर ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत सहभागी झाले. पक्ष कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. घरची परिस्थिती अगदीच बेताची, प्रपंचाचीही भ्रांत नव्हती, कुटुंबाचा गाडा हाकणं म्हणजे तारेवरची कसरतच. पण तरीही पक्ष कार्यात खंड पडू दिला नाही. पोटतिडकीने त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. जनकार्याची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. पक्षाची धुरा त्यांनी इमाने इतबारे वाहिली. शेतकरी, कष्टकरी, कामगार व गोरगरिबांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. आपल्या कुटुंबाचा विचार न करता आधी पक्ष व जनतेला प्राधान्य देणाऱ्या शंकरराव दानव यांचा संघर्षमय प्रवास आता थांबला आहे. सर्वसामान्यांचा लढवय्या नेता आता शांत झोपी गेला आहे. "श्वास थांबला पण काया लोपली नाही, धगधगत्या विचारांची अजून चळवळ थांबली नाही, सदैव प्रेरणा देईल ही वाट क्रांतीची, कम्युनिस्टांच्या क्रांतीची कधी वाट थांबली नाही."
शेतकरी, शेतमजूर, कामगार व कष्टकरी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सदैव आवाज उठविणाऱ्या या कम्युनिस्टवादी नेत्याला लोकसंदेश न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
Comments
Post a Comment