Latest News

Latest News
Loading...

वेदनेने विव्हळत सोडला वाघाच्या बछड्याने जिव, वन विभागाला उशिराने आली जाग

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिट कक्ष क्रमांक सहा पासून २० ते ३० किमी अंतरावर असलेल्या सुकणेगाव शिवारात पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. वाघिणी सोबत संचार करतांना हा बछडा भटकला आणि अशक्तपणामुळे विव्हळत त्याने दम सोडला. वाघाचा बछडा वेदनेने विव्हळत असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. पण अधिकारी व कर्मचारी उशिरा पोहोचल्याने वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वणी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोनडवले आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली. वाघिणी पासून भटकल्यानंतर अशक्तपणामुळे जिव गमावलेल्या बछड्याचे वय पाच महिन्यापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मागील काही दिवसांपासून विरकुंड, घोन्सा, बोर्डा, रासा, सुकणेगाव या पट्ट्यात वाघाचा वावर असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पट्ट्याचे निरीक्षण केले असता त्यांना काही ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. परंतु वाघाला पकडण्याकरिता कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात आले नाही. एक पट्टेदार वाघीण आपल्या दोन बछड्यांना घेऊन जंगल शिवारात संचार करीत असल्याचे गावकऱ्यांनी वेळोवेळी वन विभागाला सांगितले. काहींना तर या वाघिणीचे दर्शन देखिल झाले. परंतु वन विभागाने वेळकाढू धोरण अवलंबिले. ३१ जानेवारीला सुकणेगाव जंगल शिवारात पट्टेदार वाघाचा बछडा वेदनेने विव्हळत असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. परंतु वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी खूप उशिराने त्याठिकाणी पोहोचल्याने दुपारी २ वाजता वाघाच्या बछड्याने जिव सोडला. वाघाचा बछडा तडफडत असल्याची माहिती मिळूनही वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले नाही. परिणामी वाघाच्या बछड्याने विव्हळतच प्राण सोडला. या बछडयाला वेळेत उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमधून ऐकायला मिळत आहे. 

वन्य जीवांच्या संवर्धनासाठी व त्यांच्या संगोपनासाठी शासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. त्यांच्या देखभालीवर मोठा खर्च केला जातो. त्यांची वेळोवेळी काळजी घेतली जाते. परंतु काही वन परिक्षेत्रात तेवढी तत्परता दाखविली जात नाही. वणी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सुकणेगाव जंगल शिवारात उपचाराअभावी एक वाघाच्या बछड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींचं मन हेलावलं आहे. वाघाचा बछडा वेदनेने विव्हळत असल्याची माहिती देऊनही वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी उशिराने त्याठिकाणी पोहोचल्याने वाघाच्या बछड्याचा नाहक बळी गेल्याची खुली चर्चा आता गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे वणी वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अकर्तव्यदक्षपणा आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. वणी वन विभागाच्या सुस्त कारभारामुळे ग्रामीण जनता कमालीची त्रस्त झाली असून वन्य प्राण्यांकडे लक्ष देण्यासंदर्भात ग्रामीण जनतेने अनेकदा वन विभागाकडे तक्रारी देखिल केल्या आहेत. परंतु उपाययोजना करतांना दिरंगाई करण्यात येत असल्याने वन विभागाप्रती ग्रामीणांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे.  

No comments:

Powered by Blogger.