प्रशांत चंदनखेडे वणी
समाजात वास्तविक व वैचारिक दृष्टीकोन निर्माण करण्याकरिता प्रबोधन व व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे झाले आहे. खरा इतिहास समाजाला कळावा म्हणून व्याख्यानातून समाज प्रबोधन व जन जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. महापुरुषांनी केलेली सामाजिक क्रांती, त्यांची शिकवण व त्यांचा आदर्श जोपासला जावा, याकरिता महापुरुषांच्या विचारांची पेरणी करणं गरजेचं झालं आहे. महापुरुषांनी समाजात मानवीमूल्य रुजविण्याकरिता केलेला संघर्ष समाजातील प्रत्येक घटकाला कळावा या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी द्वारा यावर्षीही जाहीर व्याख्यानाचे आजोजन करण्यात आले आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त ३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता स्थानिक शेतकरी मंदिर लॉन येथे हा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ख्यातनाम विचारवंतांची उपस्थिती लाभणार आहे.
जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर (अमरावती) हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. तर बोल ८५ (यु-ट्यूब) चे संचालक तथा प्रसिद्ध कवी व लेखक राहुल नागपाल (दिल्ली), आंबेडकरी अभ्यासक व रिपाई नेते प्रा. डॉ. प्रदीप दंदे (अमरावती), जेष्ठ संपादक तथा आंबेडकरी विचारवंत भूपेंद्र गणवीर (नागपूर), बहुजन कवियत्री वंदना सिद्धार्थ (दिल्ली) हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांचं भारतीय संविधान, लोकशाही आणि सामाजिक पक्षांची भूमिका या विषयावर तर भूपेंद्र गणवीर यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी राज्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. बौद्धिक विचारांची पातळी वाढविणारं असं हे व्याख्यान राहणार असून या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आंबेडकरी विचारमंचचे अध्यक्ष गौतम तेलंग, उपाध्यक्ष रामदास कांबळे, संजय तेलंग, सचिव घनश्याम पाटील, सहसचिव मनोहर ठमके, कोषाध्यक्ष बंडू कांबळे तथा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांनी अथक परिश्रम घेऊन कोट्यावधी वर्चस्व गमावलेल्या जनतेसाठी अहोरात्र संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षामुळे समाज आज ताठ मानेनं जिवन जगतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमुळे बहुजनांना सन्मानाचं जीवन मिळालं. आज भारतीय संविधानाच्या संदर्भाने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. परंतु भारतीय संविधान हा जनतेचा प्राण आहे. भारतीय संविधान संपविण्याची भाषा केली जात असली तरी संविधान संवर्धनाच्या दिशेने भारतीय जनता एकवटली पाहिजे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments: