Latest News

Latest News
Loading...

आत्महत्यांचे सत्र सुरूच, शहरातील आणखी एका युवकाने मृत्यूला कवटाळले

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता वाढविली आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जीवन नकोसे झाल्यागत लोकं आत्महत्या करू लागले आहेत. जीवनातील आव्हाने व संकटांना सामोरे न जाता आत्महत्येचा मार्ग निवडला जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे. जीवन जगण्याची आस सोडून आणखी एका युवकाने मृत्यूला कवटाळल्याची घटना शहरात घडली आहे. शहरातील भोईपुरा (टागोर चौक) येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३ फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. गणेश विजय राखुंडे असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने मध्यरात्री गळफास लावल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मृतक गणेश राखुंडे हा नळ जोडणी व दुरुस्तीचे (प्लम्बर) काम करायचा. त्याचा सात ते आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आई व भाऊ रात्री झोपी गेल्यानंतर त्याने आपल्या रूममध्ये गळफास घेतला. पहाटे तो गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला. मूल जन्माला येण्यापूर्वीच पित्याचे छत्र हरपल्याने पत्नी दुःख सागरात बुडाली आहे. तर मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने आईचे काळीज फाटले आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या या युवकाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश राखुंडे याने आत्महत्या केल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ व पत्नी असा आप्त परिवार आहे. पोलिस त्याच्या आत्महत्या कारण्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.