Latest News

Latest News
Loading...

घाई घाईत बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा तोल गेला, बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशी गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

घाई घाईत बसमध्ये चढण्याचा उतावीळपणा एका प्रवाशाच्या चांगलाच अंगलट आला. बस प्लॅटफार्मवर लागत असतांनाच उतावीळपणे बसमध्ये चढण्याच्या गडबडीत तोल जाऊन खाली पडल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. बसचे समोरील चाक प्रवाशाच्या पायावरून गेल्याने त्याचा तुटला आहे. बसच्या चाकाखाली अक्षरशः प्रवाशाचा पाय चिरडल्या गेला आहे. प्रवासी बसखाली आल्याचे लक्षात येताच आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विनोद ढेंगळे वय अंदाजे ३३ वर्षे रा. खडकी गणेशपूर असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार दि. ११ ऑक्टोबराला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी बसस्थानक येथे घडली. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली डेपोची नांदेड-गडचिरोली (MH ४० CM ४६३८) ही बस वणी बसस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक १ वर लागत असतांनाच विनोद ढेंगळे या प्रवाशाने बसच्या दिशेने धाव घेतली. चालत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला व तो खाली पडला. अशातच बसचे समोरील चाक त्याच्या पायावरून गेल्याने त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला आहे. नांदेड गडचिरोली ही बस गडचिरोलीच्या प्रवासाकरिता वणी आगारातून जाणार होती. वणी डेपोमध्ये बसची तांत्रिक तपासणी केल्यानंतर बस चालक रवि मदनलाल दरोडे हा बस प्लॅटफार्मवर लावत असतांना विनोद ढेंगळे या प्रवाशाने चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्याच्या पायावरून बसचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सध्या सणासुदीचा काळ असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बसमध्ये सीट मिळावी म्हणून जोखीम पत्करली जात आहे. बस प्लॅटफार्मवर लागण्याआधीच बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक प्रवासी हा सीट मिळण्याच्या गडबडीत आततायीपणे बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न आज एका प्रवाशाच्या जीवावर बेतला असता. मात्र तो थोडक्यात बचावला असला तरी त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे बसमध्ये चढतांना सावधानता बाळगावी अशा सूचना नेहमी आगारातून केल्या जातात. मात्र प्रवासी सीट मिळण्याच्या नादात जीव धोक्यात घालू लागले आहेत.  


No comments:

Powered by Blogger.