Latest News

Latest News
Loading...

अज्ञात वाहनाच्या धडकेत सोयाबीन काढण्याकरिता आलेला मजूर ठार

प्रशांत चंदनखेडे वणी 

सोयाबीन काढण्याकरिता राजस्थान येथून आलेल्या एका मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना अर्धवन-कमलापूर मार्गावर ११ ऑक्टोबरला उघडकीस आली. कौशलकुमार रामचंद्रकुमार वर्मा (३५) रा. कुंडली ता. बांसुर जि. अलवर (राजस्थान) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. 

मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्धवन येथे सोयाबीन काढण्याकरिता राजस्थान येथून मजूर आले होते. संदीपसिंग बजरंगसिंग शेखावत या ठेकेदाराने हे मजूर आणले होते. संदिपसिंग शेखावत हे शेतातील सोयाबीन काढण्याची कामे घेतात. त्याकरिता ते दरवर्षी राजस्थान येथून मजूर बोलवतात. यावर्षीही त्यांनी राजस्थान येथून १० मजूर बोलावले होते. हे सर्व मजूर प्रशांत नुस्कावार यांच्या शेतातील बंड्यात राहायचे. १० ऑक्टोबरला सोयाबीन काढण्याचे काम आटोपल्यानंतर दुपारी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास सर्व मजूर बंड्यात आराम करण्याकरिता आले. दरम्यान कौशलकुमार वर्मा याने नविनकुमार शिवलाल वर्मा (२७) या सोबतच्या मजुराला संदीपसिंग शेखावत यांच्या ट्रॅक्टर थ्रेशरवर चालक असलेल्या रामदास मडावी रा. कमलापूर याला भेटण्याकरिता सोबत नेले. ते दोघेही रामदास मडावी याच्या घरी गेल्यानंतर काही वेळातच कौशलकुमार वर्मा हा नविनकुमार वर्मा याला काही न सांगता तेथून निघून गेला. नंतर नविनकुमार वर्मा हा देखील त्याच्या मागे गेला. मात्र त्याला कौशलकुमार हा दिसला नाही. त्याने कौशलकुमार याचा सर्वत्र शोधाशोध घेतला. परंतु तो कुठेच आढळून आला नाही. दरम्यान संदिपसिंग शेखावत यांचा नविनकुमार याला फोन आला. त्याने कौशलकुमार अचानक कुठे तरी निघून गेल्याचे ठेकेदाराला सांगितले. 

त्यानंतर ठेकेदार व सर्व मजुरांनी कौशलकुमार या मजुराचा सर्वत्र शोधाशोध सुरु केला. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सर्वांनी त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबराला पहाटे गावातीलच काही लोकांनी अर्धवन-कमलापूर मार्गावर एका व्यक्तीचा अपघात झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व मजुरांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता अपघातात मृत्युमुखी पडलेला व्यक्ती हा कौशलकुमारच असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. तो वाहनाखाली चिरडल्या गेल्याने त्याचा चेहरा छिन्न विछिन्न झाला होता. याबाबत नविनकुमार वर्मा याने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम १०६(२), २८१  नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.