प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मुर्धोनी या गावात परिवारासह राहणाऱ्या सुनिल दुधबळे या युवकाने अतुल वनकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल हा शेतमजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच आढळून आला. शेताच्या बांध्यावर गुरं ढोरं चारणाऱ्या गुराख्याला सुनिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच ही माहिती सुनिलच्या कुटुंबियांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला. सुनिलने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सुनिलच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास जमादार अमोल अन्नेलवार करीत आहे.

No comments: