प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील पुरड (नेरड) येथील वैभव कॉटन प्रा.लि. या जिनिंगचे मालक असलेल्या अशोक भंडारी यांनी जिनिंग मधील कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपयांची रोकड बँकेतून काढून आणण्यास सांगितले. कर्मचारी बँकेतून रोकड काढून दुचाकीने अशोक भंडारी यांच्या घराकडे जात असतांना भरारी पथकाने त्यांना टागोर चौकात अडविले. त्यांच्या जवळील ६० लाखांची रोकड पथकाने जप्त केली. या कार्यवाहीने एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक काळात एवढी मोठी रक्कम जवळ बाळगणे हे संशयाला वाट मोकळी करून देण्यासारखे आहे. रोख व्यवहारासाठी ही रक्कम काढण्यात आल्याचे व्यावसायिकाचे म्हणणे आहे. मात्र एवढी मोठी रक्कम एका पोत्यात भरून मोटसायकलने घेऊन जाणे संशयास्पदरित्या वाटल्याने पथकाने ही कार्यवाही केली. दुचाकी वरून रोकड नेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळताच त्यांनी भरारी पथकासह टागोर चौक येथे येऊन या दुचाकीला थांबविले. दुचाकीस्वारांजवळील तब्बल ६० लाखांची रक्कम पथकाने जप्त केली. ही रक्कम कापसाचा चुकारा देण्याकरिता बँकेतून काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण अशोक भंडारी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा व भरारी पथकाने संयुक्तरित्या केली.

No comments: