३७० कलम हटविल्याचं भांडवल करून सरकार देत आहे मूळ मुद्द्यांना बगल, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे
प्रशांत चंदनखेडे वणी
काश्मीरला विशिष्ट राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील ३७० कलम हटविलं तेंव्हा मी उद्धव ठाकरे भाजप सोबत होतो. आणि आता भाजप कडून प्रचार करण्यात येत आहे की ३७० कलम काढलं तेंव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत बसून विरोध करीत होते. ३७० कलम काढतांना आम्ही भाजपला पाठिंबा दिला. आणि आता अमित शहा म्हणतात की काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. असा विरोधाभासी प्रचार आता भाजपचे नेते करू लागले आहेत. अहो आधी तुम्ही मला ढकललं नंतर मी तुम्हाला लात मारली. परंतु ३७० कलम हटविल्याचं भांडवल करून तुम्ही जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत आहे, असे खणखणीत उद्गार शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. ते संजय देरकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. माहाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ आज शासकीय मैनावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महायुती सरकारच्या फसव्या धोरणांवर उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत महायुती सरकारच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढतांना ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान हा देशाचा असतो. तो कुणावर अन्याय व भेदभाव करीत नाही. हा जवळचा, तो आवडता, हा नावडता असे धोरण पंतप्रधानांचे नसते. मात्र या पंतप्रधानांनी एकतर्फी सरकार चालविलं आहे. देशाचे पंतप्रधान हे भारत सरकार नाही तर भाजप सरकार म्हणतात. जनतेचे कोणतेच प्रश्न या सरकारने सोडविले नाही. नोट बंदी करून या सरकारने महिलांनी वाचवून ठेवलेले पैसे लुटले. आणि आता लाडक्या बहिणी म्हणून त्यांना १५०० रुपये देत आहेत. पंधराशे रुपये महिलांना दिले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. मात्र आम्ही सत्तेत आल्यास महिलांना ३००० हजार रुपये देऊ व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही स्थिर ठेऊ. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम या विद्यमान सरकारने केलं आहे. "सब मिलके लुटेंगे और आपासमे बाटेंगे" हा अजेंडा यांनी महाराष्ट्रात राबविला आहे. मराठी युवक हा बेरोजगारीत खितपत पडला आहे. महागाईने जगणं मुश्किल केलं आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. आणि मोदी सरकार फक्त ३७० कलम हटविल्याच्या डिंग्या हाकत आहे. आज हे शिवसेना काँग्रेस झाली असे म्हणतात. परंतु कित्येक वर्ष शिवसेना भाजप सोबत राहिली. मग काय शिवसेना भाजप झाली. भाजपने काश्मीरमध्ये मुफ्ती मेहबुबाशी युती केली, मग भाजपने त्यांचं धोरण अवलंबलं काय. चंद्राबाबू भाजपशी जुळले आहेत. नितीश कुमार आपल्या विचारांना बगल देऊन भाजपशी जुळले आहेत. मग ते भाजपमय झाले आहेत काय.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. आणि या सरकार कडून मात्र ३७० कलम हटविल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात आहे. महाराष्ट्रातील पैसाही गुजराल पाठविला जात आहे. मोठमोठे उद्युत प्लांटही गुजरातला उभारण्यात आले आहे. महाराष्ट्राचं ऐश्वर्य नाहीसं करण्याचं काम या सरकारनं चालविलं आहे. महिला मुलींना सुरक्षा पुरविण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. महिला मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. तेंव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास महिलांसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची व्यवस्था केली जाईल. तेथे अधिकारी व कर्मचारी फक्त महिलाच असतील. महाविकास आघाडी सरकार मुलींबरोबरच महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांनाही मोफत शिक्षण देईल. मुंबई सारख्या महानगरात स्वस्त दरात घरे बांधून दिले जातील. युवकांच्या रोजगाराला प्रथम प्राधान्य दिले जाईल. आधी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. हे गुजराती धोरणाचं सरकार महाराष्ट्राला कंगाल करू पाहत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेबाहेर खेचून महाविकास आघाडीचं विकासात्मक धोरणाचं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे, असे आवाहन त्यांनी या भव्य प्रचार सभेतून केले. पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभेला नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. दुपारी १ वाजता त्यांचं हेलिकॉप्टरने शहरात आगमन झालं. आणि लगेच त्यांनी सभास्थळी येऊन भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या प्रत्येक शब्दाला उपस्थित जनसमुदायाने हुंकार भरला.
निवडणूक भरारी पथकाने उद्धव ठाकरे यांच्या बॅगची केली तपासणी आणि शिवसैनिक संतापले
कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड देण्यात आले होते. हेलिकॉप्टर तेथे उतरल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. हा मुद्दा त्यांनी नंतर प्रचार सभेतही मांडला. येथे लोकशाही मुळीच उरली नसल्याची खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. येथे आमच्या बॅग तपासल्या जातात. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बॅग मात्र तपासल्या जात नाही. एवढेच नाही तर सरकार मधील मंत्री व नेत्यांच्याही बॅग तपासल्या जात नाही. निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी आता पर्यंत किती जणांच्या बॅग तपासल्या असा प्रश्न केला. मात्र त्यांनी तुमचाच पहिला दौरा असल्याचे उत्तर दिले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी यानंतर सर्वांच्याच बॅग तपासल्याचे चित्रीकरण मला हवे आहे, असा सज्जड इशारा या पथकाला दिला.
लोकसभा निवणुकीच्या वेळी मिंदेने पुष्कळ बॅग भरून आणल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅग तपासण्यात आल्या नाही. त्यात कपडे असल्याचे सांगण्यात आले. एवढे कपडे हे एकाचवेळी घालतात काय, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पैसे वाटण्याचं काम यांचं आहे, आमचं नाही. त्यामुळे आता सरकार मधील सर्वांच्याच बॅगची तपासणी झाली पाहिजे. निवडणूक अधिकाऱ्यांनी यात दुजाभाव करू नये. कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी व्हायला हवी. कारण हे संविधान विरोधी सरकार आहे. सरकार मधील कोणत्याही मंत्र्याच्या बॅग निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात न आल्यास माझे शिवसैनिकच नाही तर महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या बॅग तपासेल. तसा सर्व मतदारांना अधिकारही आहे. पण त्यावेळी मात्र पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्ये येऊ नये, असा निर्वाणीचा इशारा यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.



No comments: