Latest News

Latest News
Loading...

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कार्यवाही, पण उत्पादन शुल्क विभागाचं मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यात अवैध दारूचा महापूर वाहत असतांना उत्पादन शुल्क विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क विभाग नावालाच उरला की काय हे चित्र निर्माण झालं आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कुणाचाच नियंत्रण राहिलं नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निव्वळ खुर्च्या तोडण्याचे काम करीत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांत पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही केली. अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस विभाग आपलं कर्तव्य बजावत असतांना उत्पादन शुल्क विभाग मात्र स्वस्थ बसला आहे. यामागचं कारण काय, हेच कळायला मार्ग नाही. आलिशान कारमधून देशी दारूची अवैध वाहतूक केली जात आहे. गावखेड्यात सर्रास देशी दारूचा अवैध पुरवठा होत आहे. ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. एवढेच नाही तर पोलिस अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करीत आहे. पण उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र मलिंदा खाण्यातच गुंग असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी आलिशान कारमधून अवैध विक्री करीता जाणारी दारू पकडली. मोक्षधाम मार्गे रासा येथे अवैध विक्री करीता नेण्यात येत असलेली देशी दारू पोलिसांनी सापळा रचून पकडली. कारसह देशी दारूचे १७ बॉक्स असा एकूण ३ लाख ५६ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही बुधवार दि.६ नोव्हेंबरला रात्री १० वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. शहरातही अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. अवैध दारू विक्रेत्यांच्या हिमती प्रचंड वाढल्या आहेत. याला कारणीभूत कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील व शहरालगत असलेल्या बहुतांश ढाब्यांवर मद्य प्राशन केले जाते. काही ढाब्यांवर तर दारुची सर्रास विक्री केली जाते. मंदर जवळ असलेल्या एका ढाब्यावर अवैध दारू विक्रीला उधाण आल्याने ग्रामस्थांनी हा ढाबाच पेटवून दिला होता. अशी अनेक गावे आहेत, जेथे राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जाते. मात्र काही गावातील लोक भीतीने उठाव करीत नाही. नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यातील मुरधोनी येथे राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते. 

एवढेच नाही तर शहरालगत असलेल्या राजूर कॉलरी, लालगुडा चौपाटी, वागदरा, भालर, बोर्डा, रासा, विरकुंड. मोहर्ली या गावांमध्ये दारूची अवैध विक्री होत असतांना उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे अवैध दारू विक्रेते निर्ढावले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय अगदीच आड रस्त्यावर असून ते कुणाच्या दृष्टीसही पडत नाही. याठिकाणी कधी अधिकारी असतात तर कधी कार्यालय बंद अवस्थेतच असतं. शासनाकडून पगार मिळतो आणि खिशेही गरम होतात. त्यामुळे अधिकारी चांगलेच मग्रावले आहेत. हे अधिकारी कधीही शहरात गस्त घालतांना दिसत नाही. दारू दुकाने किती वाजता उघडतात व केंव्हा बंद होतात, याचं उत्पादन शुल्क विभागाला काही देणंघेणं नाही. फक्त वरकमाई कडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. अधिकारीच अवैध दारू विक्रेत्यांच्या दावणीला बांधले गेल्याने कार्यवाही करणार तरी कोण, ही खुली चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. शिंदोला येथे अधिकृत दारू विक्रीच्या दुकानांप्रमाणे पहाटे पासून अवैध दारू विक्री केली जाते. पण हे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही. मागील काही दिवसांत उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही नगण्य आहे. कार्यालयात येणं आणि घरी जाणं हाच त्यांचा दिनक्रम झाला आहे. पोलिस विभागाच अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करतांना दिसतो. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या बियरबारवरही पोलिस विभागाच लक्ष ठेऊन असतो. मग उत्पादन शुल्क विभाग आहे तरी कशासाठी हा प्रश्न निर्मण होणे साहजिकच आहे. 

६ नोव्हेंबरला रात्री गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला दीपक चौपाटी येथून मोक्षधाम मार्गे रासा येथे दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी मोक्षधाम रस्त्यावर सापळा रचला. रात्री १० वाजता या मार्गाने एक आलिशान कार येतांना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून कारची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे १७ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कार चालकाला दारू विक्रीच्या परवान्याबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला दारूचा साठा कुठे नेत आहे असे विचारले असता त्याने रासा येथे नेत असल्याचे सांगितले. दारूचा परवाना नसतांना दारूची वाहतूक करणाऱ्या सौरभ किशोर नगराळे (२३) रा. राजूर कॉलरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळून देशी दारूचे १७ बॉक्स किंमत ५६ हजार ७१२ रुपये व कार (WB ०६ E २७७७) किंमत ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख ५६ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी सौरभ नगराळे याच्यावर पोलिसांनी मदकाच्या कलम ६५ (अ) (इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.