Latest News

Latest News
Loading...

संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, शहरातून काढण्यात आली भव्य रॅली


प्रशांत चंदनखेडे वणी 

महाविकास आघाडीत वणी मतदार संघ काँग्रेसला न सुटल्याने प्रचंड निराश झालेल्या संजय खाडे यांनी शेवटी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. काँग्रेस कडून उमेदवारी मिळण्याची शेवट पर्यंत आशा ठेऊन असलेले संजय खाडे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पाठीशी शिवसेना (उबाठा) व काँग्रेसच्या काही जेष्ठ व अनुभवी नेत्यांची फळी आहे. महाविकास आघाडी कडून उमीदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना व काँग्रेस पक्षातील काही नेते नाराज झाले होते. ते आता संजय खाडे यांच्या समर्थनार्थ उभे आहेत. बुधवार ६ नोव्हेंबरला संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. त्यावेळी ही नाराज नेते मंडळी व संजय खाडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षातून बाहेर पडलेले हे सर्व नेते संजय खाडे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 

शहरातील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन संजय खाडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी संजय खाडे यांच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅलीही काढण्यात आली. त्याचप्रमाणे भांदेवाडा येथे जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेऊन ग्रामीण भागातील प्रचाराला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजाअर्चा करून संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. त्यानंतर रंगनाथ स्वामी मंदिर ते जैताई मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत संजय खाडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमाला माजी आमदार विश्वास नांदेकर व जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांची उपस्थिती लाभली. संजय खाडे यांना शिट्टी हे बोध चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्या समर्थकांनी शिट्टी वाजवून वणीकरांचे लक्ष वेधले. दुपारी जैताई मंदिर येथे रॅलीची सांगता झाली. आणि नंतर संजय खाडे यांचा ताफा भांदेवाडा येथे रवाना झाला. भांदेवाडा येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात दर्शन घेऊन ग्रामीण भागाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. 
भांदेवाडानंतर संजय खाडे व समर्थकांनी वनोजा देवी, घोगुलधरा, वेगाव, वरझडी येथे जाऊन दर्शन घेतले. दरम्यान या मार्गावरील गावांना ताफ्याने भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शुभारंभ कार्यक्रमाला गौरीशंकर खुराणा, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच विश्वास नांदेकर यांचे समर्थक उपस्थित होते. मार्चमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता. 

No comments:

Powered by Blogger.