पटवारी कॉलनी येथील राहत्या घरातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
पटवारी कॉलनी येथील राहत्या घरून प्रतिबंधित सुगंधित तंबूखाचा साठा जप्त करण्यात आला. ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाने १५ डिसेंबरला केली. या कार्यवाहीत एकूण १ लाख ११ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी सुधिर बाबाराव बढे (४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार अनिल बेहेरानी यांना पटवारी कॉलनी येथील राहत्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहिती वरून ठाणेदारांनी गुन्हे शोध पथकाला राहत्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले. गुन्हे शोध पथकाने घराची झडती घेतली असता तेथे सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. आरोपीने अवैध विक्री करीता राहत्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. एका पांढऱ्या रंगाच्या बोरीत सुगंधित तंबाखूचे २०० ग्राम वजनाचे १२० डब्बे पोलिसांना आढळून आले. प्रत्येकी ९३५ रुपये किंमती प्रमाणे १ लाख ११ हजार २६५ रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पंचनामा केल्यानंतर त्यांच्या तक्रारी वरून सुधिर बाबाराव बढे या आरोपीवर अन्न सुरक्षा मानके नियम व नियमने कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल बेहरानी व गुन्हे शोध पथकाने केली.
Comments
Post a Comment