विटंबना प्रकरणातील सूत्रधारांचा शोध न घेता आंबेडकरी जनतेलाच टार्गेट करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटंबनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले असतांनाच वणी उपविभागातूनही या देशद्रोही घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशाच्या संविधानाप्रती द्वेष भावना ठेवणाऱ्या त्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण जनतेतून होऊ लागली आहे. या घटनेचा आज वणी शहरातही तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी व शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची माथेफिरूने विटंबना केली. संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा असून देशाचा सर्व कारभार संविधावर चालतो. संविधानाने भारतीय जनतेला एक सुरक्षा कवच दिलं आहे. कायद्याचं राज्य असलेल्या देशातच संविधान विरोधी भूमिका घेणारे समाजविघातक लोक शांतता भंग करू पाहत आहे. अशा समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आंबेडकरी समाजावरच गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण केली जात आहे. ही एक प्रकारची दडपशाही आहे. न्यायालयीन कोठडीत एका निष्पाप जीवाचा बळी गेला. संविधान प्रेमी व कायद्याचा अभ्यासक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी युवकाचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या त्या माथेफिरुला आंबेडकरी जनतेने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असले तरी अन्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही  संविधान शिल्पाची तोडफोड करणारे हात त्या माथेफिरूचे असले तरी बुरख्यामागचे चेहरे अजून स्पष्ट झालेले नाहीत. उलट आंबेडकरी समाजावरच गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. संपूर्ण देश संविधानावर चालतो. देशातल्या प्रत्येक मानसाचं व त्यांच्या मालमत्तेचं रक्षण संविधान करतं. मात्र संविधानाची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी समाजच रस्त्यावर उतरतो. कारण घटनाकाराला एका जाती व समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचं षडयंत्र येथील व्यवस्थेनं व्यवस्थित रचलं आहे. सतत संविधान विरोधी भूमिका घेतल्या जात असतांना सरकार अद्यापही ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत नाही. उलट संविधान विरोधी कृती करणाऱ्यांच्या विरोधात पेटून उठणाऱ्या आंबेडकरी समाजाचीच मुस्कटदाबी केली जात आहे. 

कायद्याचे रक्षकच बेकायदेशीरपणे वस्त्यावस्त्यात जाऊन महिला पुरुषांना मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. लोकशाही प्रधान देशात दडपशाही सुरु झाली आहे. आवाज उठविणाऱ्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. तेंव्हा सूड भावनेतून आंबेडकरी जनतेला अमानुष मारहाण करून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेतानाच सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी युवकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्याच बरोबबर आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेऊन संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या बुरख्यामागील चेहऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी देखील भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका, समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

निवेदनावर भारतीय बौद्ध महासभेचे प्रविण वनकर, मोरेश्वर देवतळे, रमेश तेलंग, आनंद पाटील, तन्मय लामसोंगे, सचिन वानखेडे वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, किशोर मुन, दिलीप वाळके, माजी नगराध्यक्ष करुणा कांबळे, प्रांजल वनकर, प्रणिता ठमके, अर्चना कांबळे, चंद्रकला लोहकरे, करुणा बन्सोड, संध्या खोब्रागडे, वैशाली पाटील, रेखा पाटील, वंदना पळवेकर, सुकेशनी मुनेश्वर, संगीता मानकर, पुष्पा लोहकरे, तुळसाबाई नगराळे यांच्यासह ६६ समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी