गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन) येथील विकासकामांचं होईल काय निरीक्षण, फळाभरलेलं मोसंबीचं झाड जेसीबी चालकानं तोडलं
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात सध्या विकास कामे जोमात सुरु आहेत. नगर पालिकेच्या माध्यमातून गल्ली बोळात सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. ज्या कंत्राटदारांना रस्ते व नाल्यांच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले त्या कंत्राटदारांकडून दर्जाहीन कामे करण्यात येत असल्याची ओरड ऐकायला आहे. गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन जवळ) येथे नुकतेच रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र सिमेंट रस्त्याच्या कडेला गट्टू न लावता निव्वळ काँक्रेट पसरविण्यात आल्याने कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शहरात बहुतांश भागात रस्ते बांधतांना रस्त्याच्या कडेला गट्टू लावण्यात आले. मात्र गौरकार कॉलनी येथीलच कंत्राट वेगळे का, हा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कंत्राटदाराला कंत्राट दिल्यानंतर नगर पालिका प्रशासनाकडून बांधकामाची गुणवत्ता तपासण्याकरिता कुठल्याही प्रकारचे निरीक्षण केल्या जात नसल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावत आहे. शहरात काही ठिकाणी अतिशय निकृष्ठ दर्जाची कामे झाल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. मात्र टक्केवारीने सर्वांच्याच कानात बोळे घातले असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
गौरकार कॉलनी येथे आता पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन टाकण्याकरिता जेसीबीने खोदकाम करण्यात येत आहे. मात्र खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकाने खोदकामात कुठलेही अडसर नसणारे फळाभरलेले मोसंबीचे झाड निर्दयीपणे मुळासकट उफटुन फेकले. हे झाड सहा ते सात वर्षांपूर्वी स्वतः नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याठिकाणी लावले होते. येथील नागरिकांनी संगोपन व संवर्धन कडून या झाडाला मोठे केले. या झाडाला भरगच्च मोसंबी लागायच्या. मुलंबाळं व महिला पुरुषांना मोफत मोसंबी खायला मिळायच्या. मात्र जेसीबी चालकाने नगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता निर्दयीपणे हे फळाभरलेले झाड तोडले. वृक्ष लागवडीवर शासन व प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. नगर पालिकाही वृक्ष लागवडीचे धडे देते. मात्र विकासकामांच्या नावाखाली सर्रास झाडांची कत्तल केली जात आहे.गौरकार कॉलनी पासून अगदीच काही अंतरावर कोळशाचे मालधक्के आहेत. या मालधक्क्यांवरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडते. धूळ प्रदूषणाने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे. प्रदूषणापासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता व वातावरणात समतोल राखण्याकरिता येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे असतांना येथील बहरलेली झाडे तोडण्यात येत असल्याने नगर पालिकेच्या दुटप्पी धोरणाबाबत आता नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. नगर पालिका हद्दीत असलेले व स्वतः नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लावण्यात आलेले सहा ते सात वर्ष जुने असलेले हे मोसंबीचे झाड मनमर्जीने तोडण्यात आले. त्यामुळे या कंत्राटदाराच्या जेसीबी चालकावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या झाडामुळे खोदकामात कुठलाही अडथळा निर्माण झालेला नसतांना जेसीबी चालकाने हे झाड का तोडले, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहानिशा करून वृक्षतोड करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होऊ लागली आहे
Comments
Post a Comment