अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
उभ्या ट्रकला मागून पिकअपची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात जखमी पिकअप चालकाचा नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर मृत्यू झाला. हा अपघात काल 18 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील वागदरा गावाजवळ घडला. करण चंदू पुंड (25) रा. पळसोनी ता. वणी असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
करण पुंड हा तरुण एका खाजगी कंपनीच्या मालवाहू पिकअपवर चालक म्हणून कामाला होता. तो पूनवट येथील कोल वाशरी येथे साहित्य पोहचून वणीला परतत असताना वागदरा गावाजवळ नादुरुस्त होऊन उभ्या असलेल्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकला (MH 34 AV 2365) मागून पिकअपची (MH 34 FC 5628) जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की पिकअपचा पार चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाहन चालकाला घटानास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पिकअप मधून बाहेर काढून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला तातडीने नागपुर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आज त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. तरुण मुलाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे
Comments
Post a Comment