मोमीनपुरा येथील मारहाण प्रकरणी दोन गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील मोमीनपुरा येथे टोळक्याने येऊन मारहाण केल्याची घटना १८ डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. हॉकी स्टिक व रॉडने एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. याबाबत दोन्ही गटातील सदस्यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने पोलिसांनी १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.  

इम्रान खान शहाबान खान (३६) रा. मोमीनपुरा यांच्या तक्रारी नुसार त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय असून भालर रोडवर त्यांची विटभट्टी आहे. त्यांच्या कडून जमीर खान मेहमूब खान यांनी १६ ट्रॅक्टर विटा खरेदी केल्या. ९ हजार ५०० रुपये ट्रॅक्टर याप्रमाणे १ लाख ५० हजार रुपयांचे बिल जमीर खान मेहमूद खान यांच्याकडून घ्यायचे असल्याने ते त्यांच्या आमेर बिल्डर या नावाने असलेल्या गंगशेट्टीवार अपार्टमेंट मधील ऑफिसमध्ये गेले. तेथे त्यांना बिलाचे पैसे तर मिळाले. पण नोटांचा एक बंडल त्यांनी बदलवून मागितला असता त्यांना तो बदलवून देण्यात आला नाही. आणि यावरूनच त्यांच्यात झालेला वाद विकोपाला जाऊन प्रकरण हाणामारी पर्यंत पोहचले. इम्रान खान शहाबान खान यांनी नोटांचा तो बंडल तेथेच ठेऊन ते तेथून माघारी परतले. नोटांचा बंडल बदलवून न दिल्यास पोलिस स्टेशनला तक्रार करणार असल्याची त्यांनी जमीर खान यांना चेतावणी दिल्याने जमीर खान यांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. इम्रान खान हे रात्री ८ वाजता पान ठेल्यावर उभे असतांना जमीर खान हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आले व हॉकी स्टिकने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. त्यांना आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नंतर त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. त्यांनी झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी जमीर खान मेहमूब खान (४३), कैफ हाफिज खान (३४), सय्यद आयान सय्यद एजाज (२६), सय्यद रेहान सय्यद एजाज (२४), अफसर चिनी यासिम चिनी (३०), अजहर चिनी यासिन चिनी (३५), अयबाज खान अजिज खान (२५) सर्व रा. मोमीनपुरा यांच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

मोहम्मद कैफ मोहम्मद हाफिज (२३) रा. गुलशन नगर याच्या तक्रारी नुसार तो मागील दोन महिन्यांपासून जमीर खान मेहमूब खान या आपल्या मामाकडे राहतो. तसेच त्यांच्या आमेर बिल्डर या ऑफिसमध्ये काम करतो. जमीर खान यांनी घरासमोरील रोडवर बांधलेले गतिरोधक त्यांनी आठ दिवसांपूर्वी काढून टाकले. यावरून इम्रान खान शहाबान खान हा मोहम्मद कैफ मोहम्मद हाफिज व त्याच्या नातेसंबंधातील लोकांना विनाकारण शिवीगाळ करायचा. १८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता मोहम्मद कैफ व त्याचा मित्र मोमीनपुरा येथील एका पानठेल्याजवळ उभे असतांना इम्रान खान हा तेथे आला व तुझ्या मामाने गतिरोधक काढले असे म्हणत जोरजोरात शिवीगाळ करू लागला. त्यानंतर तेथे इस्माईल शहाबान खान, छोटे खान शहाबान खान, इरफान खान शहाबान खान, सायाम खान इस्माईल खान, कौसेन खान, आयान शेख हे सर्व जण आले. आणि त्यांनी मोहम्मद कैफ याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या सर्वांनी मिळून मोहम्मद कैफ मोहम्मद हाफिज याला लाथा बुक्क्यांनी व रॉडने जबर मारहाण केली. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी या सर्वांवर बीएनएसच्या कलम 118(1), 189(2), 191(3), 190, 115(2), 351(2)(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी