प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन) येथे पाणी पुरवठ्याची नवीन पाईप लाईन टाकण्याकरिता खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकाने कुठलाही अडथळा नसतांना फळाभरलेले मोसंबीचे झाड तोडले. मोसंबीच्या झाडावर निर्दयीपणे जेसीबी चालवून हिरव्यागार झाडाची कत्तल केली. फळांनी बहरलेलं मोसंबीचं झाड जेसीबीने मुळासकट उफटून टाकलं. नगर परिषद हद्दीत असलेलं व खोदकामात कुठल्याही प्रकारचा अडथळा नसलेलं हिरवंकंच मोसंबीचं झाड विनाकारण जेसीबीने तोडण्यात आल्याने याची चौकशी करून जेसीबी व जेसीबी चालकावर वृक्ष संरक्षण नियमांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी अर्जातून केली आहे.
वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनावर शासन लाखो रुपयांचा खर्च करते. प्रशासनाकडूनही वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करण्यात येते. सामाजिक उपक्रमांतर्गतही ठिकठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात येते. असे असतांना जगलेली झाडे निर्दयीपणे तोडण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नगर पालिकेकडून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली असतांना ७ ते ८ वर्षांपूर्वी नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गौरकार कॉलनी येथील खुल्या जागेत मोसंबीचे झाड लावण्यात आले होते. नंतर येथील नागरिकांनी या झाडाची पूर्ण काळजी वाहिली. मोसंबीच्या छोट्या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर झाले. छोट्या रोपट्यापासून तर झाड मोठं होईपर्यंत त्याचं संगोपन व संवर्धन येथील नागरिकांनी केलं. नंतर या झाडाला भरगच्च मोसंबी लागायच्या. येथील लहान मुलांपासून तर सर्वांनाच विनामूल्य मोसंबी खायला मिळायच्या. मात्र मोसंबीने बहरलेलं हे झाड पाषाणहृदयी जेसीबी चालकाने निर्दयीपणे तोडलं. त्याला हे झाड तोडण्याचा अधिकार कुणी दिला. झाड तोडतांना नगर पालिकेची परवानगी घेतली काय, हे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. परंतु खोदकामात कुठलाही अडथळा नसतांना जेसीबी चालकाने हे झाड का म्हणून तोडले, हेच कळायला मार्ग नाही. विकासाच्या नावाखाली विशाल वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याने वृक्ष प्रेमींमधूनही कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तहसील कार्यालयासमोरील बदामाचे झाड तोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता मोसंबीचे झाड तोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी न. प. मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी अर्जातून केली आहे.
No comments: