प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वणी घोन्सा मार्गावरील मोहर्ली गावाजवळील सूतगिरणी जवळ तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागपूर येथे हलविण्यात आले होते. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना तरुणाने ३ जानेवारीला शेवटचा श्वास घेतला. पियुष गोकुलदास काळे (२४) रा. पद्मावती नगर वणी असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरंबी (मारेगाव) येथे शेत व घर असल्याने पियुष हा दुचाकीने तेथे फेरफटका मारण्याकरिता गेला होता. कोरंबी (मारेगाव) वरून वणीला परतत असतांना मोहर्ली गावाजवळील सूतगिरणी जवळ त्याच्या दुचाकीला (MH २९ CG ०३४२) अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. यात पियुष हा गंभीर जखमी झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. पियुष हा जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे या मार्गाने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टिस पडले. त्याने लगेच ही माहिती त्याच्या चुलत भावाला दिली. तसेच पियुषला तात्काळ रुग्णालयात हलविले. परंतु त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला शीघ्र नागपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र नागपूर येथील रुग्णालयात तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पियुषने ३ जानेवारीला शेवटचा श्वास घेतला. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबरला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास पियुषचा अपघात झाला होता. याबाबत पियुषचा चुलत भाऊ सुरेंद्र रामकृष्ण काळे (४१) रा. कोरंबी (मारेगाव) यांनी शुक्रवार दि. १० जानेवारीला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: