प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या साधनकरवाडी येथील कुलूपबंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याची घटना सोमवार दि. ३ फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून शहरात घरफोडीची ही मोठी घटना घडल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. घटनास्थळी श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्स्पर्टला बोलाविण्यात आले असून शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथक चोरट्यांचा कसून शोध घेत आहे. वणी पोलिस स्टेशनचा नुकताच पदभार सांभाळलेल्या ठाणेदारांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
शहरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. चोरी व घरफोडीच्या घटना शहरात प्रचंड वाढल्या आहेत. पोलिसांचा वचक न राहिल्याने चोरटे चांगलेच निर्ढावले असल्याचे दिसून येत आहे. गुन्हे शोध पथक तर निव्वळ नावालाच उरले असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. तर आता गजबजलेला परिसर असलेल्या साधनकारवाडी येथे घरफोडीची घटना घडल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचे दिसत आहे. गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून शहरातील प्रमुख चौक व मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली भेदून चोरटे चोरीचे डाव साधू लागले आहेत. साधनकरवाडी येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चिंडालिया हे २५ जानेवारीला कुटुंबासह लांबच्या प्रवासाला गेल्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराला टार्गेट केले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व किंमती वस्तू असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु प्रदीप चिंडालिया हे बाहेरगाव वरून परतायचे असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
३ फेब्रुवारीला साफसफाई करणारी महिला जेंव्हा त्यांच्या घरी साफसफाई करायला आली तेंव्हा तिला घराच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे महिलेला घरी चोरी झाल्याचा संशय आला. तिने लगेच ही माहिती घरमालक प्रदीप चिंडालिया यांना दिली. घरी कुणी नसतांना स्वयंपाक खोलीचा दरवाजा उघडा असल्याची माहिती कानावर पडताच प्रदीप चिंडालिया यांचा मुलगा शीघ्र नागपूर वरून वणीला पोहचला. मुलाने घरी येऊन बघितल्यानंतर त्याला घरातील अवस्था बघून घरी चोरी झाल्याचे कळून चुकले. त्यांने तात्काळ पोलिस स्टेशनला येऊन याबाबत तक्रार नोंदविली. गजबजलेली वस्ती असलेल्या साधनकरवाडी येथे घरफोडी झाल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिसांकडून शीघ्र हालचाली करण्यात आल्या. श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्सपर्टला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावण्याकरिता पूर्ण तपास यंत्रणा कामी लावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडेही तपासाची सूत्रे देण्यात आली आहे. वणी पोलिस स्टेशनमध्ये नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्यापुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान आता ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्यापुढे राहणार आहे.
No comments: