प्रशांत चंदनखेडे वणी
महापुरुषांबद्दल अपमानजनक व वादग्रस्त वक्तव्य करून जनभावना दुखावणाऱ्या तथा इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी फोनवर बोलतांना अश्लील शब्द प्रयोग करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी जनतेनी केली आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कडक कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक करण्याच्या मागणीला घेऊन जनआक्रोश उसळला आहे. प्रशांत कोरटकर याने महापुरुषांबद्दल अनादरीत वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहे. प्रशांत कोरटकर हा विकृत विचारांचं विष पेरणारा व्यक्ती असून विषमतावादी विचारसरणी त्याच्या डोक्यात भरली असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून दिसून येते. त्याने छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जेम्स लेन याने केलेल्या विकृत लिखाणाचे देखील समर्थन केले आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सतत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याबद्दल शिवप्रेमी व बहुजनांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.
त्याने महापुरुषांबद्दल केलेले अपमानजनक वक्तव्य व इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवर दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे बहुजनांमध्ये संतापाची लाट उसळती आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर नामक या विकृत बुद्धीच्या व्यक्तीला अटक करण्याच्या मागणीला घेऊन शिवप्रेमी जनता आक्रमक झाली आहे. प्रशांत कोरटकर याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ व त्याला अटक करण्याच्या मागणीला घेऊन ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढले जात आहे. तसेच संपूर्ण राज्यातून त्याला अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची मागणी वणी पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातूनही करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी जनतेने वणी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन प्रशांत कोरटकर याच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करण्यात न आल्यास संभाजी ब्रिगेड कडून संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
No comments: