प्रशांत चंदनखेडे वणी
गावातील पान टपरीवर खर्रा घेण्याकरिता गेलेल्या युवकाशी दारूच्या नशेत वाद घालून त्याच्या डोक्यावर वीट मारून जखमी केल्याची घटना मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बुरांडा (खडकी) येथे घडली. याबाबत जखमी युवकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे वास्तव्यास असलेला मनोज सूर्यभान पावले (२९) हा गवंडी काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता कामावरून घरी परतल्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन गावातील पान टपरीवर खर्रा घेण्यासाठी गेला. तेथे शंकर वारलुजी वराडकर (३५) हा मद्य प्राशन करून आला. त्याच्या सोबत त्याचा मुलगा देखील होता. शंकर वराडकर याने दारूच्या नशेत मनोज याच्याशी वाद घालत त्याच्या डोक्यावर वीट मारली. तसेच त्याच्या मुलाने मनोजला खाली पडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परत येथे भेटला तर जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकीही मनोजला देण्यात आली. बापलेकांच्या मारहाणीत मनोज हा जखमी झाला. तो चक्कर येऊन खाली पडला. मनोजला मारहाण झाल्याचे कळताच त्याचे वडील व काका घटनास्थळी पोहचले. त्यांनी मनोजला सोबत घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. मनोजने मारहाण करणाऱ्या बापलेकांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. मनोज पावले याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी शंकर वराडकर व त्याच्या १७ वर्षीय मुलाविरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
No comments: