Latest News

Latest News
Loading...

अवैध दारू विक्रेत्यावर महिलांचा हल्लाबोल, दारू विक्रेत्याने काढला पळ, पोलिसांत गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मुकुटबन मार्गावरील सुकणेगाव फाट्यावर राजरोसपणे सुरु असलेली अवैध दारू विक्री नारीशक्तीने उधळून लावली आहे. अवैध दारू विक्रेत्याने येथे दारू विक्रीचा अड्डा थाटला होता. सुकणेगाव फाट्यावर १८ नंबर पुलाजवळ तो सर्रास दारू विकायचा. दारू विक्रेता हा प्रचंड निर्ढावला होता. त्यामुळे महिलांनी येथे सुरु असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात कंबर कसली. येथे सुरु असलेली अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याकरिता महिला मोठ्या प्रमाणात सरसावल्या. अवैध दारू विक्री सुरु असलेल्या ठिकाणी या महिला धडकल्या. महिलांचं रौद्र रूप पाहून अवैध दारू विक्रेता दारू तेथेच सोडून पळत सुटला. त्यानंतर महिलांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करीत घटनास्थळावरून अवैध दारूचा साठा जप्त केला. तसेच अवैध दारू विक्रेता गणेश मिलमिले याच्यावर गुन्हा दाखल केला. 

ग्रामीण भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गावखेड्यात अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचे अड्डे थाटले आहे. गावात व गावालगत मुबलक दारू मिळत असल्याने गावकरी व्यसनाधीन होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण आले असतांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. शहरात एका कानाकोपऱ्यात असलेले उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत उत्पादन शुल्क विभागाने एकही मोठी कार्यवाही केल्याचे दिसत नाही. पोलिसच अवैध दारू विक्रेत्यांच्या कुंडल्या शोधून त्यांच्यावर कार्यवाही करतांना दिसतात. निवडणूक काळात शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीला सुकाळ आला होता. पोलिसांनी याकाळात अवैध दारू विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही केली. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ स्व-महसूल वाढविण्यात मशगुल असल्याचे पाहायला मिळाले. शिंदोला तेथे आजही अवैध दारू विक्रीचा महापूर वाहत असतांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी केवळ उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबादारी असणारे अधिकारीच सुज्ञ हरपले असल्याची चर्चा जनमानसांतुन ऐकायला मिळत आहे. 

ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात महिलांनाच वेळोवेळी दंड थोपटावे लागते. नारीशक्तीलाच दारू विक्रीचे अड्डे उध्वस्त करण्याकरिता पुढाकार घ्यावा लागतो. गावात व गावाजवळ सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची व अवैध दारू विक्रेत्यांवर वचक ठेवण्याची तसदी अधिकारीवर्ग घ्यायला तयार नसल्याने ही जबादारी महिलांनाच पार पाडावी लागत आहे. अवैध दारू विक्री विरोधात महिलांनाच कंबर कसावी लागत आहे. कारण दारूच्या अति व्यसनामुळे महिलांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहेत. सूकणेगाव फाट्यावर १८ नंबर पुलाजवळ सुरु असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात गावातीलच महिला सरसावल्या. महिलांनी येथे सुरु असलेली अवैध दारू विक्रीच उधळून लावली. 

सूकणेगाव फाट्यावर अवैध दारू विक्रीचा अड्डा थाटलेल्या गणेश मिलमिले याला अद्दल घडविण्याचा निर्धार करून गावातील महिला तेथे धडकल्या. त्यांचं रौद्र रूप पाहून गणेश मिलमिले हा दारू तेथेच सोडून सुसाट पळाला. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. महिलांनी अवैध दारू विक्रेत्यावर हल्लाबोल केल्याची माहिती ग्रामीण भागातच गस्त घालणाऱ्या जमादार संतोष आढाव व प्रवीण जाधव यांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. तेथे गावचे उपसरपंच व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून अवैध दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी या कार्यवाहीत ९० मिली क्षमतेच्या १०० शिश्या असा एकूण ३४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारू विक्रेता गणेश मिलमिले रा. वणी याच्यावर पोलिसांनी मदाका च्या कलम ६५(e) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार संतोष आढाव करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.