Latest News

Latest News
Loading...

जिल्हा परिषद शाळेतूनही गुणवंत विद्यार्थी घडतात, झेडपीतुन शिक्षण घेणारा विद्यार्थी झाला जीएसटी निरीक्षक

प्रशांत चंदनखेडे वणी 

जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थीही शैक्षणिक भवितव्य घडवू शकतात याचा साक्षात्कार जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थ्याने घडवून दिला आहे. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणारा हा विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी झाला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही गुणवत्ता प्राप्त करू शकतात हे या विद्यार्थ्याने दाखवून दिलं आहे. शिक्षणाची जिद्द उरी बाळगणाऱ्या या विद्यार्थ्याने शैक्षणिक जीवनात अथक परिश्रम घेत यशाचं शिखर गाठलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या या विद्यार्थ्यांची जीएसटी निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे. खुशाल झोटिंग असे या एमपीएससी परीक्षेत गरुड झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण अभ्यास करून यश संपादित केल्याने त्याचा खैरे कुणबी समाज संघटनेच्या वतीने विठ्ठलवाडी येथे सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे संकुचित दृष्टिकोनातून बघीतले जाते. झेडपी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षित होण्याची क्षमता कमी असते, अशी समज दृढ झाली आहे. मात्र हा गैरसमज अनेक विद्यार्थ्यांनी मोडीत काढला आहे. झेडपी शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकले आहेत. उच्च अधिकारी होण्यापर्यंत झेडपीच्या विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. जीएसटी अधिकारी झालेल्या खुशाल झोटिंग या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेतूनच शैक्षणिक जीवनाची सुरवात केली. मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ हे त्याचं गाव. त्याचे वडील अनिल झोटिंग हे शेतकरी. त्यांच्याकडे जेमतेम ५ एकर शेती. यावरच संसाराचा गाडा हाकतांना त्यांनी मुलाचं शिक्षण देखील पूर्ण केलं. मुलाच्या शिक्षणात त्यांनी कुठलीच कमी पडू दिली नाही. 

मुलाची शिक्षणाची जिद्द पाहता ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यशस्वी जीवनाची पायाभरणी करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांना चांगलेच ठाऊक होते. सुख, समाधान व सन्मानानं जीवन व्यतीत करायचं झाल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही पूर्ण कल्पना असलेल्या अनिल झोटिंग यांनी मुलाच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ दिला नाही. कारण त्यांच्या परिवारातही पाच सदस्य पदवीधर आहेत. परिस्थिती जेमतेम असतांनाही त्यांनी खुशालला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. प्रतिकूल परिस्थितीत खुषालनेही जिद्दीने शिक्षण घेत यशाचा मार्ग गाठला. त्याला स्पर्धा परीक्षेत अपयशाचाही सामना करावा लागला. परंतु अपयशाने खचून न जाता त्याने शेवटी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. एमपीएससी मार्फत आता खुशालची जीएसटी निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. खुषालने संपादन केलेले यश हे बोध घेण्यासारखे आहे. एक म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे असक्षम नसतात, तर दुसरे अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केले की, यशाचा मार्ग गवसतो. जिद्द व परिश्रमाने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी बनलेल्या खुशालचा खैरे कुणबी संघटनेच्या वतीने विठ्ठलवाडी येथे सत्कार करण्यात आला, व त्याला पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिवाकर नरुले, गणेश लाकडे, रामदास भोयर, भास्कर सोमलवार, बाबाराव राऊत, नारायण मांडवकर, परशुराम पोटे आदी समाजातील मंडळी उपस्थित होती. 

खुशाल झोटिंग याने संपादन केलेल्या यशाबद्दल आणि त्याच्या भावी जीवनातील यशस्वी वाटचाली बद्दल लोकसंदेश न्यूज परिवाराकडून अभिनंदन व शुभेच्छा. 

No comments:

Powered by Blogger.