वणी उपविभागात पावसाचा जोर वाढला, मुसळधार व संततधार पावसामुळे निर्माण झाली पूर परिस्थिती, अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान
प्रशांत चंदनखेडे वणी :-
मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. वणी उपविभागात जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर नाल्यांमधील पाण्याचा ओढा प्रचंड वाढला आहे. संततधार व मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतात शेततळे निर्माण झाले असून शेतातील पिकं धोक्यात आली आहेत. वणी व झरी तालुक्यातील काही गावं नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे प्रभावित झाली आहेत.
पुरामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे. पूर परिस्थिती निर्माण झालेल्या गावांना तात्काळ आपत्कालीन मदत पोहोचविण्याच्या तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर आमदार संजय देरकर हे पूरग्रस्त भागांना स्वतः भेटी देत आहेत. गावकऱ्यांशी चर्चा करून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याची त्यांना हिंमत देत आहेत. आमदार देरकर यांनी स्वतः शेताच्या बांधावर जाऊन शेत पिकांची पाहणी केली, व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
वणी उपविभागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे नदी नाले फुगले आहेत. नद्यांची पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून नद्या धोकादायक स्थितीत वाहू लागल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेऊन आहे. पूर परिस्थिती नियोजनाची पूर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असून पूर परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्यासाठी प्रशासन पूर्णतः सतर्क असल्याचे सांगण्यात येत आहे. वणी उपविभागात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. थोडी उसंत दिली की, धो-धो पाऊस पडतो. आकाशातून तीव्र स्वरूपाच्या जलधारा कोसळतात. १८ ऑगस्टला दुपारी १ वाजता नंतर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. रात्रभर कोसळधार पाऊस पडला. १९ ऑगस्टला सकाळी १२ वाजेपर्यंत सारखा पाऊस सुरु होता. १९ ऑगस्टला पहाट उजाडली पण ती सायंकाळ प्रमाणे वाटत होती. ढगाळ वातावरणामुळे वेळेचाही अंदाज येत नव्हता. दुपारी १ वाजता पहाट उजाळल्यासारखं वाटत होतं. ढगाळ वातावरण व सतत पडणाऱ्या पावसामुळे पावसाची झड लागल्याच्या चर्चा नागरिक करतांना दिसत होते.
संततधार पावसामुळे नदी नाले उफान मारू लागल्याने वणी उपविभागातील काही गावांना पुराचा तडाखा बसला आहे. नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने काही गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वणी तालुक्यातील बोरी या गावाला पुराचा मोठा फटका बसला असून पुरामुळे मूर्ती या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच झरी तालुक्यातील पैनगंगा नदी पासून जवळ असलेल्या पाटण, दुर्भा, दिग्रस, सातपल्ली, कमळवेल्ली व धानोरा या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांना आमदार संजय देरकर यांनी भेट देऊन या गावांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व पोलिसही उपस्थित होते.
आमदार देरकर यांनी या गावांमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या तहसीलदारांना सूचना दिल्या. तसेच गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपायोजना करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळावी या दृष्टीने ते शासनापर्यंत पोहोचवावे, अशा सूचनाही आमदारांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. आमदारांनी स्वतः शेताच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केली. पूर परिस्थिती निर्माण झालेल्या गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रशासन नेहमी तुमच्या सोबत आहे, असा त्यांच्यात विश्वास जागवला. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे काळजीत आलेल्या गावकऱ्यांना त्यांनी आधार व दिलासा दिला.
No comments: